होलोकॉस्ट सारख्या कालखंडाचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 11:30 AM2021-01-26T11:30:33+5:302021-01-26T11:33:53+5:30
आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृतीदिनाच्या निमित्ताने विद्यापीठात काळोखातील प्रकाशरेषा या पुस्तकाचे प्रकाशन
होलोकॉस्टसारखा महत्त्वाचा कालखंड, त्यातील घटना आणि त्याचा अभ्यास , त्या दरम्यान घडलेली कृत्ये, संहार शिवाय त्यातूनही जे लोक वाचले त्यांचे पुढील आयुष्य या साऱ्याचा आपण अभ्यासक्रमात समावेश करू शकतो का? अशी विचारणा महाराष्ट्राचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांना केली आहे. सोमवार, २५ जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिन आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते संबोधित करत होते.
जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण पुढे जात असताना अनेकांना एकछत्री अंमल किंवा हुकूमशाही असावी असे वाटत असते . मात्र होलोकॉस्टसारख्या मोठ्या घटनेने काळाची गती कशी बदलली, विविध जाती, धर्म , पंथातील लोक एकत्र येतो तेव्हा समाज कसा घडतो हे आजच्या पिढीला कळणे, अभ्यासणे आवश्यक असल्याने तो अभ्यासला गेला पाहिजे असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. बदला हा उपाय नसून त्याबाबतचे शिक्षण हा आहे अशी प्रतिक्रिया देत त्यांनी कोविड काळानेही समाजाला कशी बांधिलकी शिकवली आहे हे सांगितले. शिक्षक हा कसा आपल्या विद्यार्थ्यांना शिष्यांना कटूता, द्वेष यांपासून दूर करून प्रेमाच्या, आपुलकीच्या प्रकाशाकडे नसतो याचे काळोखातील प्रकाशरेषा उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीची नाझी राजवट तसेच त्यांच्या मित्र देशांकडून ६० लाख ज्यू तसेच लाखो रोमा, समलैंगिक, शारिरिक आणि मानसिक रुग्ण आणि अन्य लोकांचे हत्याकांड करण्यात आले. या हत्याकांडाला हॉलोकॉस्ट म्हणून संबोधले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने २७ जानेवारी हा आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मृती दिन म्हणून घोषित केला आहे. या दिवशी रशियाच्या लाल सैन्याने ऑशवित्झ बर्केनाऊ येथील मृत्यू छावणी मुक्त केली. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने एका श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर, इस्रायलचे कॉन्सुल जनरल याकोव फिंकलश्टाइन तसेच जर्मनी, इटली, अर्जेंटिना, युएई, ऑस्ट्रेलिया इ. देशांचे राजनायिक अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, लेखक उपस्थित होते.
काय आहे काळोखातील प्रकाशरेषा
या प्रसंगी वरिष्ठ पत्रकार सुचिता देशपांडे यांच्या काळोखातील प्रकाशरेषा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक फ्रीडल (फ्रेडरिका) डिकर ब्रांडाइस या शिक्षिकेबद्दल आहे जिने दुसऱ्या महायुद्धादरम्यान झेकोस्लोवाकियामधील तेरेझिन छळ छावणीत शेकडो मुलांना चित्रकला, संगीत आणि नाट्य प्रशिक्षणाद्वारे जगण्याची नवी उमेद दिली. ऑक्टोबर १९४४ मध्ये फ्रीडलची तेरेझिनमधील ६० मुलांसह ऑशवित्झ मृत्यू छावणीत रवानगी करण्यात आली. तेथील गॅस चेंबरमध्ये तिची हत्या करण्यात आली. पण तिने शिकवलेले अनेक विद्यार्थी वाचले आणि पुढे नावाजलेले चित्रकार बनले. सुचिता देशपांडे यांनी २०१४ साली इस्रायलच्या अभ्यासदौऱ्यात याद वाशेम होलोकॉस्ट म्युझियमला भेट दिली असता तिथे त्यांना फ्रीडल चित्ररुपाने भेटली. आयुष्याच्या काळोख्या रात्री, समोर मृत्यू आ वासून उभा असताना कलेचा उपचार म्हणून वापर केला. होलोकॉस्टमध्ये एका संपूर्ण समाजाचे भूतलावरुन उच्चाटन करण्याचा प्रयत्न पुन्हा घडू नये तसेच महाराष्ट्रात या कालखंडाबद्दल अधिक जागरुकता निर्माण व्हावी यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे सुचिता देशपांडेंनी सांगितले.
वाचताना होलोकॉस्टसारखा कालखंड केवळ घटना वाटते मात्र त्याचा अभ्यास केल्यावर तो काळ कल्पने पलीकडे घडलेल्या अकल्पित घटनांचा असल्याचे चित्र नजरेसमोरून भासते याचा अनुभव मी घेतला आहे. शिक्षणाच्या पलीकडे जाऊन मानवी मूल्यांची जपणूक महत्त्वाची ठरत असते. भूतकाळातील अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी जागरूकता आजच्या तरुण वर्गात निर्माण करायला हवी ही जाणीव होलोकॉस्ट देत असते आणि काळोखातील प्रकाशरेषा ही त्याचाच भाग आहे
डॉ सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ