ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - दिवा स्थानकातील दगडफेकीत मोटरमन जखमी झाल्यानंतर मध्य रेल्वेवरील मोटरमन्सनी शुक्रवारी दुपारी सीएसटी स्थानकात आंदोलनाचा पवित्रा घेतला. वरिष्ठांनी समजूत काढल्यावर काही वेळातच हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी तोपर्यंत हाबर्र मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
शुक्रवारी सकाळी पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल रोको केले. जमावाने केलेल्या दगडफेकीत मोटरमनही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती समजताच मोटरमन्सनी सीएसटी स्थानकात दुपारी आंदोलनाचा पवित्रा घेतला. लोकल गाड़्या सोडून मोटरमन आंदोलनात सहभागी झाल्याने काही काळासाठी हार्बर आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे हार्बर मार्गावरील टिळकनगर स्थानकात प्रवाशांचा उद्रेक झाल्याचे वृत्त आहे. मात्र याविषयी अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.