Join us

स्कूलबस तपासणीला न पाठवण्याचा पवित्रा

By admin | Published: May 01, 2017 4:38 AM

प्रादेशिक परिवहन विभागाचे ‘फिटनेस सर्टिफिकेट’ असणाऱ्या स्कूलबस चालकांच्या बसेसची पुन्हा तपासणी केली जाणार आहे

मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागाचे ‘फिटनेस सर्टिफिकेट’ असणाऱ्या स्कूलबस चालकांच्या बसेसची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. अवैधरीत्या रस्त्यांवर फिरणाऱ्या स्कूल व्हॅनकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे राज्यासह मुंबईतील बस मालक त्रस्त असून, स्कूल बस ओनर्स असोसिएशनतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जोपर्यंत रस्त्यावर धावणाऱ्या अवैध स्कूल व्हॅनची तपासणी करण्यात येणार नाही, तोपर्यंत स्कूल बस तपासणीला पाठवण्यात येणार नसल्याचे, असोसिएशनतर्फे शनिवारी स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी शाळेत रोज स्कूलबसमधून ये-जा करतात. या विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी स्कूलबसमध्ये मालकांनी नियमानुसार बदल केले आहेत. राज्यात सुमारे ३८ हजारांहून अधिक स्कूलबस धावतात, तर मुंबईत जवळपास ९ हजार स्कूलबसेस आहेत. स्कूलबसमधून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च न्यायालयाने परिवहन विभागातर्फे चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. सुरक्षेसाठी एक नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन स्कूलबस मालकांनी केले आहे. त्यानुसारच आरटीओने स्कूलबसेना ‘फिटनेस सर्टिफिकेट’ दिले आहे, तरीही पुन्हा बसची तपासणी का, असा प्रश्न असोसिएशनने उपस्थित केला आहे. आरटीओकडून बेकायदेशीरीत्या सुरू असलेल्या स्कूल व्हॅनविरोधात कोणतीही कारवाई अथवा चाचणी न घेण्यात आल्याने स्कूल बस ओनर्स असोसिएशनने या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. सर्व नियम फक्त आम्हालाच लागू करण्यात येत असून, स्कूल बस सुस्थितीत असतानादेखील आम्हाला चाचणीची सक्ती करण्यात येत असल्याने, हा निर्णय घेण्यात आल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)