‘पवित्र’ पोर्टलला शिक्षण संस्थाचालकांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 04:39 AM2018-07-10T04:39:09+5:302018-07-10T04:39:22+5:30
शासनाने सुरू केलेल्या ‘पवित्र’ पोर्टलला विरोध करत शिक्षण संस्था चालकांनी राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
मुंबई : शासनाने सुरू केलेल्या ‘पवित्र’ पोर्टलला विरोध करत शिक्षण संस्था चालकांनी राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शासनाच्या निर्णयांमुळे शिक्षण संस्था चालकांच्या अधिकारावर गदा येत असल्याचा ठरावही संस्था चालकांच्या महामंडळाने पुणे येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीत मंजूर केला आहे. तसेच औरंगाबाद येथे मंगळवारी, १० जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची माहितीही महामंडळाचे मनोज पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षण क्षेत्रात नवनवीन धोरणांचा समावेश केला जात आहे. मात्र बहुतेक निर्णयांमध्ये शिक्षक किंवा संस्था चालकांना मर्जीत घेतले जात नाही. याउलट जबरदस्तीने शासन निर्णय लादण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यात शासनाने सुरू केलेल्या पवित्र नावाच्या पोर्टलमुळे संस्थाचालकांच्या अडचणीत भर पडली आहे. शिक्षण संस्थांनी या पोर्टलमधून शिक्षकांची निवड करून त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे संस्था चालकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचे एकमत महामंडळाच्या बैठकीत झाले. तसेच शासनाच्या ह्या निर्णयाविरोधात सर्व संस्था चालकांनी एकत्र येत लढा देण्याचा निर्धार केला.
संस्था चालकांविरोधी शासन निर्णयांचा विरोध करण्यासाठी जिल्हानिहाय बैठका घेऊन रणनीती आखण्याचा ठराव ७ जुलै रोजी पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने १० जुलै रोजी औरंगाबाद येथील व्ही. एन. पाटील विधि महाविद्यालयात सकाळी १० वाजता संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्था चालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संस्था चालकांनी बैठकीत होणाºया निर्णयाचे एकमताने पालन करण्याचे आवाहन मनोज पाटील यांनी केले आहे.