गृह खाते उद्धव ठाकरे यांच्याकडेच; खातेवाटप एक-दोन दिवसात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 05:05 AM2019-12-07T05:05:58+5:302019-12-07T05:10:02+5:30

आजच्या बैठकीला पवार, ठाकरे यांच्याशिवाय अजित पवार, जयंत पाटील, खा. संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई उपस्थित होते. 

Home account with Uddhav Thackeray; Account sharing within a day or two | गृह खाते उद्धव ठाकरे यांच्याकडेच; खातेवाटप एक-दोन दिवसात

गृह खाते उद्धव ठाकरे यांच्याकडेच; खातेवाटप एक-दोन दिवसात

Next

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तूर्त गृहखाते राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे यांच्यात शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
आजच्या बैठकीला पवार, ठाकरे यांच्याशिवाय अजित पवार, जयंत पाटील, खा. संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई उपस्थित होते. मंत्रिमंडळाचा शपथविधी २८ नोव्हेंबरला झाला. त्यावेळी उद्धव यांच्यासह सात जणांनी शपथ घेतली होती. मात्र अजूनही खातेवाटप होऊ शकले नाही. खातेवाटप लवकरात लवकर करा, असे शरद पवार यांनी बैठकीत ठाकरे यांना सांगितल्याचे समजते.
महत्वाचे गृह खाते राष्ट्रवादीला मिळणार की, ते उद्धव ठाकरे स्वत:कडेच ठेवणार याबाबत उत्सुकता होती. हे खाते आपल्याकडेच राहावे, अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे गृहखाते तूर्त ठाकरे यांच्याकडेच असेल.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करावा याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. एसीबीकडून क्लीन चिट मिळालेले अजित पवार अजूनही मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे मानले जाते. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अद्याप निश्चित झालेला नाही.

Web Title: Home account with Uddhav Thackeray; Account sharing within a day or two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.