मुखपृष्ठाला आत्मा देणारी ‘दलालचित्रे’
By admin | Published: December 23, 2015 12:50 AM2015-12-23T00:50:53+5:302015-12-23T00:50:53+5:30
मुखपृष्ठ केवळ पुस्तकाच्या बांधणीसाठी वरच्या पृष्ठावर काढलेले चित्र नसून तो त्या पुस्तकाचा एक भाग आहे, त्यातील मजकुराशी ते संबंधित आहे
ओंकार करंबेळकर, मुंबई
मुखपृष्ठ केवळ पुस्तकाच्या बांधणीसाठी वरच्या पृष्ठावर काढलेले चित्र नसून तो त्या पुस्तकाचा एक भाग आहे, त्यातील मजकुराशी ते संबंधित आहे याची जाणीव मराठी वाचकाला करून देणारे चित्रकार म्हणजे दीनानाथ दलाल. दलालांचे हे जन्मशताब्दी वर्ष. अवघ्या पंचावन्न वर्षांच्या आयुष्यात त्यांनी काढलेली चित्रे, मुखपृष्ठ चित्रे मराठी कलाजगत व वाचकांच्या मनात अमीट ठसा निर्माण करून गेली आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त याच चित्रांचा पुन्हा आस्वाद घेता येणार आहे.
१९१५ साली गोव्यात जन्मलेल्या दीनानाथ दलालांनी शिक्षणासाठी मुंबईत पाऊल ठेवले. त्यानंतर सुरू झाला त्यांच्या कुंचल्याचा सुंदर गतिमान प्रवास. गोव्यातील कलात्मकतेचे संस्कार, रंग, निसर्ग, तेथील रेंदेरांचे गान, सौंदर्यासक्त जाणीव त्यांच्या डोळ्यांतून चित्रांमध्ये येऊ लागली. अनेक मासिके आणि पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांनी केली. सत्यकथा, मौज आणि नंतर दीपावलीच्या मुखपृष्ठांनी मासिके, दिवाळी अंकांचा तोंडवळा पूर्ण बदलूनच टाकला व वाचकांना मुखपृष्ठाकडे पाहायला दलालांनी शिकविले. ठकीशी खेळणारी लहान मुलगी, चोपून वेणी घातलेली एखादी षोडशा, तारुण्याच्या उंबरठ्यावरची मुलगी असो वा एखाद्या मुखपृष्ठातील कमनीय बांध्याची स्त्री, यातील प्रत्येक चित्रात सौंदर्य ओतप्रोत भरलेले होते. प्रसिद्ध कलासमीक्षक आणि लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी ‘दलालचित्रां’मुळे मराठी वाचकांची दृष्टी बदलली, अशा शब्दांमध्ये त्यांच्या चित्रांचे वर्णन केले होते. ‘एकेकाळी बालगंधर्वांनी महाराष्ट्राला सौंदर्याचे धडे दिले होते, त्यांच्यानंतर कित्येक वर्षांनी दीनानाथ दलालांनी सौंदर्यकल्पना मराठी घराघरात नेऊन ठेवली,’ असे नाडकर्णी यांनी लिहून ठेवले आहे. दलालांना विसरणे म्हणजे भोवतालची सृष्टी, तिच्यातील पाने, फुले, फुलपाखरे बघायला विसरण्यासारखे आहे असे एका वाक्यात वर्णन करून नाडकर्णी यांनी ‘दलालचित्रां’चे महत्त्व सांगितले आहे.
अनेक सुबक चेहरे दलालांनी कॅनव्हासवर उतरवले. विविध मानवी भावना दाखवणारी चित्रे असोत वा नृत्य करणाऱ्या स्त्रिया, प्र्रत्येकात त्यांचा कुंचला इतरांपेक्षा वेगळा असल्याचे जाणवते. छ. शिवाजी महाराज, शिवराज्याभिषेक, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, विनोबा भावे अशी त्यांची इतर अनेक चित्रे प्रसिद्ध झाली. आता दलाल त्यांच्या चित्रांमधून आपल्याला पुन्हा भेटत आहेत. ३ जानेवारीपर्यंत वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये त्यांची चित्रे विनामूल्य पाहायला मिळणार आहेत.