Join us

सवलतीची मुदत संपल्याने घर खरेदीदारांना भरावे लागणार ५ टक्के मुद्रांक शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुद्रांक शुल्क नोंदणीसाठी दिलेली सवलत ३१ मार्च रोजी संपल्याने आता १ एप्रिलपासून मुंबईतील घर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुद्रांक शुल्क नोंदणीसाठी दिलेली सवलत ३१ मार्च रोजी संपल्याने आता १ एप्रिलपासून मुंबईतील घर खरेदीदारांना ५ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागेल.

राज्यातील बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली होती. ती २०२२ च्या मार्च महिन्यापर्यंत वाढवावी, अशी मागणी अनेक विकासकांनी केली होती. मात्र शासनाने ही सवलत वाढविली नाही. त्यामुळे आता मुंबईत घर खरेदी करताना पाच टक्के मुद्रांक शुल्क तर महिलांसाठी चार टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल.

कोरोना काळात बांधकाम व्यवसायाला मोठे नुकसान सहन करावे लागले. यामुळे २०२० च्या ऑगस्ट महिन्यात राज्य शासनाने मुद्रांक शुल्कावर तीन टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान तीन टक्के सवलत, त्यानंतर १ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान मुद्रांक शुल्कावर दोन टक्के सवलत देण्यात आली. त्यामुळे मुंबईत महिन्याला सरासरी १० हजार घरांची विक्री झाली. तसेच महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्‍क्‍याने सवलत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. त्यामुळे राज्यात महिला घर खरेदीदारांमध्येही वाढ झाली.

घर खरेदीमध्ये झालेल्या वाढीमुळे राज्य शासनाच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल जमा झाला.

बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने मुंबईत घर खरेदी वाढली. यामुळे राज्याला कोट्यवधींचा महसूल मिळाला. राज्याच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्याचा जीडीपीवरही चांगला परिणाम पाहायला मिळाला. ग्राहकांना फायदा व्हावा यासाठी बांधकाम क्षेत्राने रेडीरेकनरच्या दरातही घट केली. राज्यातील घर खरेदीचा दर कायम राहावा यासाठी मुद्रांक शुल्क सवलतीच्या कालावधीत वाढ करणे गरजेचे आहे. सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे मत त्यांनी मांडले.

टॅग्स :घर