Join us

गृह खरेदीची दसरा दिवाळी ?  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 6:48 PM

घरांच्या खरेदी विक्रीला चालना मिळण्याची आशा

मुद्रांक शुल्कातील सवलत पथ्यावर पडण्याची चिन्हे  

मुंबई : कोरोना संकटामुळे कोसळलेल्या गृह खरेदीला चालना देण्यासाठी राज्य सरकार मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्यूटी) कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे घरांच्या किंमती कमी होतील आणि दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर गृह खरेदी वाढू शकेल असा विश्वास विकासक आणि या क्षेत्रातील तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. परवडणा-या आणि मध्यम आकाराच्या घरांची मागणी या काळात वाढेल असे संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले आहेत.  

जीएसटी, नोटबंदी आणि रेरा कायद्यामुळे बांधकाम व्यवसायाला उतरती कळा लागली होती. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी महानगरांतील मुद्रांक शुल्क मार्च, २०२० मध्ये एक टक्क्याने कमी करण्यात आला होता. कोरना संकटाने या व्यवसायाचा डोलारा कोसळल्याने पुन्हा सवलतीची मागणी करण्यात आली. ३० डिसेंबर पर्यंत तीन आणि त्यानंतर मार्च, २०२१ पर्यंत दोन टक्के सवलत जाहीर करून सरकारने ती मागणी मान्य केली आहे. कोरोनामुळे कोसळलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी काही विकासकांनी घरांच्या किंमती कमी करण्यास सुरूवात केली आहे. मुंबई आणि सभोवतालच्या परिसरातील वन बीएचकेची सरासरी किंमत ही ७५ लाखांच्या (सर्वसावेशक किंमतींसह) आसपास आहे. मुद्रांक शुल्कातील दोन टक्के सवलतीमुळे दीड लाख आणि तीन टक्के सवलत दिली तर सव्वा दोन लाख रुपयांनी घरांच्या किंमती कमी होतील. घरांचे खरेदी विक्री व्यवहार होत नसल्याने राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम लक्षणीयरित्या घसरली आहे. आता या शुल्कात सवलत दिल्यामुळे घरेदी विक्रीचे व्यवहार वाढणार असले तरी सरकारी तिजोरीतील आवक मात्र घटणार आहे.  

-----------------

जीएसटी दरांतही कपात हवी

जी कुटुंब घरांच्या खरेदीचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. त्यांना या निर्मयामुळे गृह खरेदीसाठी प्रोत्साहन मिळेल. अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल असा विश्वास नरेडकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केला आहे. तसेच, केंद्र सरकारने जीएसटीच्या दरांमध्ये कपात केल्यास आणखी फायदा होईल असा दावाही त्यांनी केला. शुल्क कमी करण्याचा निर्णय परवडणा-या आणि मध्यम किंमतीच्या घरांच्या खरेदी विक्रीसाठी तो पोषक ठरेल आणि दसरा दिवाळीत खरेदी विक्रीचे व्यवहार वाढतील असा अशी आशा अँनराँक प्राँपर्टीचे चेअरमन अनूज पुरी यांनी व्यक्त केली. केवळ घर खरेदी करणा-यांसाठीच नाही तर ठप्प झालेली गृह खरेदी आणि आर्थिक संकटाचा सामना करणा-या विकासकांनाही त्यामुळे संजीवनी मिळेल असा विश्वास क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष नयन शहा यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :बांधकाम उद्योगमुंबईमहाराष्ट्र