घरचा उपाशी अन्..; 'त्या' फोटोवरुन जितेंद्र आव्हाड-शितल म्हात्रेंमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:13 AM2023-03-27T11:13:17+5:302023-03-27T11:14:31+5:30
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा गद्दार म्हणत बंडखोर आमदारांवर प्रहार केला.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या मालेगावमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'आज आपलं नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं, माझ्या हातात काहीही नाही, तरीदेखील एवढी गर्दी आली आहे. ही सगळी पूर्वजांची पुण्याई आणि आई जगदंबेचा आशिर्वाद,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंवर शिंदे गटाकडून पलटवार करण्यात येत आहे. त्यातच, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी उर्दू भाषेत उद्धव ठाकरेंच्या स्वागताचा डिजिटल बोर्ड ट्विट केल्यावरुन जितेंद्र आव्हाड आणि म्हात्रे यांच्या ट्विटरवरुन शाब्दिक युद्ध रंगलय.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा गद्दार म्हणत बंडखोर आमदारांवर प्रहार केला. तसेच, आमचं हिंदुत्त्व हे शेंडी जानव्याचं नसल्याचं सांगत हिंदुत्त्वाच्या मुद्दयावरुनही भाजपला फटकारलं. तत्पूर्वी, शनिवारी शितल म्हात्रे यांनी उर्दु भाषेतील आशयाचा एक बॅनर शेअर करत उद्धव ठाकरे गटाला प्रश्न विचारला होता.
त्याची आपल्याला चिंता नसावी..उगगाच बोलायला लावू नका,…घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी …..@sheetalmhatre1https://t.co/a5HLSZ9vSI
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2023
''ह्या मातीत छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं.. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा??'', असा सवाल केला होता. त्यावर, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रिप्लाय देत एकनाथ शिंदेंचाही तशाच आशयातील बॅनर शेअर केला. त्यावरु, दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली.
मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना ट्विट चांगलाच झोंबलेलं दिसतयं. पण, मला एक समजत नाही मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय… #उद्धव ठाकरे #ढोंगीहिंदुत्व, असा रिप्लाय शितल म्हात्रे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला होता. त्यानंतर, आव्हाड यांनी ट्विट करत शितल म्हात्रेंचा खोचक टोला लगावला आहे.
त्याची आपल्याला चिंता नसावी, उगाचच बोलायला लावू नका, ... घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी शितल म्हात्रेंना केलाय. त्यामुळे, दोघांमधील हा वाद आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.