मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरण घरोघरी जाऊन करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र तूर्तास शारीरिक अथवा वैद्यकीय कारणांनी अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांंना लस देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे. अशा नागरिकांची माहिती ईमेलद्वारे पाठविण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ६३ लाख ८८ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्ये आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, १८ वर्षांवरील सर्व नागरिक, स्तनदा माता आणि आता गर्भवती महिलांचाही समावेश आहे. मात्र लसीकरण वेगाने होण्यासाठी घरोघरी जाऊन लस द्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून सुरू आहे. खासगी केंद्रामार्फत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लसीकरण मोहीम घेण्याची परवानगी पालिकेने यापूर्वीच दिली आहे.
मात्र बोगस लसीकरणाचे काही प्रकार उजेडात आल्यानंतर कडक नियमावली तयार करण्यात आली. त्यानंतर आता, आजारपणासह शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरुणास खिळून असलेल्या व्यक्तींना कोविड लस देण्यासाठी त्या व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असल्याचे कारण ही माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.