घरच्या मेन्यूमध्ये लाडू, चिवड्याच्या जागी पावभाजी आणि रगडा पॅटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:40 PM2023-09-14T13:40:08+5:302023-09-14T13:40:47+5:30

Ganesh Mahotsav: गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांची खाण्याची बडदास्त कशी ठेवायची, यासाठी आता घरोघरी मेन्यू ठरवण्यावरून चर्चा सुरू झाली आहे.

Home menu includes laddoos, pavbhajis and ragda patties in place of chivadya | घरच्या मेन्यूमध्ये लाडू, चिवड्याच्या जागी पावभाजी आणि रगडा पॅटीस

घरच्या मेन्यूमध्ये लाडू, चिवड्याच्या जागी पावभाजी आणि रगडा पॅटीस

googlenewsNext

- दीप्ती देशमुख
मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांची खाण्याची बडदास्त कशी ठेवायची, यासाठी आता घरोघरी मेन्यू ठरवण्यावरून चर्चा सुरू झाली आहे. पूर्वी सर्रासपणे नाष्टा म्हणून देण्यात येणाऱ्या चिवडा, लाडूची जागा आता पावभाजी, रगडा पॅटीस, ढोकळा तर डाएट कॉन्शिअस असलेल्यांसाठी डाएट चिवडा, फळे, लेमन टीची सोय करण्यात येते. हा सर्व खटाटोप करण्यामागे एकच उद्देश घरी आलेला पाहुणा रिकाम्यापोटी जाऊ नये.

काळ बदलल्याने घरी आलेला पाहुणा नाष्टा करण्यास पसंती देतो. सणासुदीच्या काळात आजही पारंपरिक पदार्थांनाच प्रथम पसंती देण्यात येत असली तरी त्या पदार्थांना आधुनिक टच देण्यात येतो. बहुतांश लोकांच्या घरी चिवडा-लाडू बनविला जात असला तरी पारंपरिक पद्धतीने बनविण्यात येणाऱ्या पोह्यांच्या चिवड्याचे स्वरूप बदलत आहे.

आता लोकांच्या चवी बदलल्या
काही पाहुणे तेलकट चिवडा खाणे पसंत करत नाहीत; त्यामुळे त्यांच्यासाठी मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनविण्यात येतो; तर काहींसाठी केवळ पोह्यांचा डाएट चिवडा बनविण्यात येतो. आधी लोक डाएट कॉन्शिअस नव्हते. त्यामुळे सर्रासपणे पोह्यांचा चिवडा व बेसनाचा लाडू नाष्ट्यात असायचा. मात्र, आता लोकांच्या चवी बदलल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक पदार्थांबरोबरच ढोकळा, समोसा, कोकम सरबत, लेमन टी असे पदार्थ तयार ठेवतो, असे डोंबिवलीच्या सुलक्षणा येवले यांनी सांगितले.

बच्चे कंपनीसाठी चॉकलेट मोदक
बाप्पाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पदार्थ केल्यानंतर दमछाक होत असल्याने काही महिला इन्स्टंट फूड खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. 
‘बाप्पांसाठी निरनिराळे पदार्थ केल्यानंतर दमछाक होते; पण बाप्पांशिवाय पाहुण्यांनाही खाऊ-पिऊ घालून खूश करायचे असते. अशा वेळी काही इन्स्टंट पदार्थ मदतीला धावून येतात. 
नैवेद्यासाठी केलेली कोथिंबीर वडी, अळूवडी, मोदकाशिवाय चिवडा, लाडू तर असतोच; पण तयार असलेले फ्रेंच फ्राइज, रेडीमेड इडली, ढोकळा पीठ, ओट मिल्सचाही आधार घेतला जातो,’ असे ठाण्याच्या रहिवाशी अक्षना देशपांडे यांनी सांगितले.  त्याशिवाय मुलांसाठी वेगवेगळी चॉकलेट्स किंवा चॉकलेट मोदक देऊन त्यांना खूश करण्यात येते, असेही देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: Home menu includes laddoos, pavbhajis and ragda patties in place of chivadya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.