Join us

'अमित शहांच्या पायगुणाने ठाकरे सरकार जावं अन्...'; नारायण राणेंनी केली प्रार्थना

By मुकेश चव्हाण | Published: February 06, 2021 3:32 PM

अमित शहा यांच्या दौऱ्याचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आले.

मुंबई/ सिंधुदुर्ग: माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे मेडिकल कॉलेजचं रविवार 7 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी अमित शहा  सिंधुदुर्गात येणार आहेत.

अमित शहा यांच्या दौऱ्याचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. अमित शहा हे 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.50 वाजता गोवा येथून हेलिकॉप्टरने पडवे मेडिकल कॉलेज येथे येणार असून उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ते दोन तास सिंधुदुर्गात थांबणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण तसेच अनेक आमदार, खासदार व भाजपाची  नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

अमित शहा यांच्या कोकण दौऱ्याबाबत भाष्य करताना नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत, त्यांच्या पायगुणाने ठाकरे सरकार  जावं आणि चांगलं सरकार यावं, अशी मी प्रार्थना करेन असं नारायण राणे यांनी सांगितलं. तसेच ठाकरे सरकारमुळे महाराष्ट्र मागे चाललाय, अशी टीकाही नारायण राणेंनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केली. 

दरम्यान, दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अमित शाह यांचा हा कोकण दौरा अनिश्चित मानला जात होता. मात्र, आता अमित शाह यांनी 7 फेब्रुवारीला कोकणात येण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता या दौऱ्याच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

मी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता- नारायण राणे

मेडिकल कॉलेजच्या काही फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यालयात पाठवल्या होत्या. त्यानिमित्त नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन करुन माहिती दिली. नारायण राणे म्हणाले की, परवानगीसाठी फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला. तुमच्याकडे परवानगीसाठी फाईल आली आहे, सही करा असं त्यांना सांगितलं. त्यानंतर माझ्याकडे फाईल आली आहे का? मी म्हटले, जीआर काढा. रुटीन फाईल आहे. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले बरं. आमच्यात तेवढाच संवाद झाल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :अमित शहानारायण राणे उद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार