मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या चौकशीतून काही गोष्टी पुढे आल्या आहेत. या बाबी माफ करण्यालायक नाहीत अशा अक्षम्य गोष्टी आहेत. त्यामुळे चौकशीत बाधा येऊ नये यासाठीच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. ही नियमित प्रशासकीय बदली नाही, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी अँटिलिया स्फोटक प्रकरणी पोलिसांकडून चुका झाल्याची स्पष्ट कबुली दिली. (Mistakes made by police; Home Minister Deshmukh's confession). त्यानंत, गृहमंत्री आज दिल्लीत पोहोचले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०' सोहळ्यात घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके, मुंबई पोलिस आयुक्तांची बदली आणि सचिन वाझे प्रकरणावर थेट भाष्य केले. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय तसेच आयुक्तांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून गंभीर चुका घडल्या आहेत. त्या माफ करण्यालायक नाहीत म्हणूनच पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली केल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. तसेच, गृहमंत्री पदावर यापुढेही तुम्हीच असणार का? या प्रश्नावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.
देशमुख यांचे गृहमंत्रिपद पुढील वर्षभर कायम राहणार का? या प्रश्नावर जोपर्यंत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेश आहे, तोपर्यंत मी गृहमंत्री राहणार आहे. गृहमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, असे त्यांनी अलीकडेच दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितल्याचेही देशमुख म्हणाले. अनिल देशमुख हे आज सकाळीच दिल्ली दरबारी पोहोचले असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. राज्यातील सचिन वाझे प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत. त्यामुळे, पवार-देशमुख भेटीत नेमकी काय चर्चा होते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.