गृहमंत्र्यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीनं स्पष्टच सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 11:42 AM2021-03-22T11:42:30+5:302021-03-22T11:43:34+5:30
परमवीरसिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला व गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय...
मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना भेटल्याचा आरोप करणारे माजी आयुक्त परमवीर सिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची चौकशी होईलच व त्यादृष्टीने कारवाई होणार. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या चिठ्ठीवर जो वाद निर्माण झाला, त्यावर नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण देत उत्तर दिले आहे.
परमवीरसिंग यांनी बदली झाल्यावर ही चिठ्ठी लिहिली आहे. परमवीरसिंग यांनी १७ मार्चला बदली होणार हे माहित असताना १६ मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाझेना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचदरम्यान अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला. १५ दिवस हॉस्पिटलमध्ये नंतर २७ फेब्रुवारीपर्यंत गृहविलगीकरणात होते. २७ फेब्रुवारीला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असतानाही पुरावा तयार करून कटकारस्थान करत बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता, असेही मलिक म्हणाले. हा आरोप गंभीर आहे याची चौकशी होईल या चौकशीत जे निष्पन्न होईल त्यादृष्टीने कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा सहभाग स्पष्ट झाल्याने महाविकास आघाडी सरकारची पुरती कोंडी झाली आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन छेडले असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तो चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे. मात्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा नेते रस्त्यावर उतरत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर, आता आमदार राम कदम यांनी पोलीस महासंचालक हेमंत नरगळेंची भेट घेणार असल्याचे सांगितलंय.