माजी सैनिक मारहाण प्रकरणाची नव्याने होणार चौकशी - गृहमंत्री अनिल देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 04:32 AM2020-09-16T04:32:48+5:302020-09-16T06:21:38+5:30
चाळीसगाव गाव येथील माजी सैनिक सोनू एका कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत होते. २ जून, २०१६ रोजी उन्मेष पाटील काही गुंडांना घेऊन घरात घुसले.
मुंबई : जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी एका माजी सैनिकाला मारहाण केल्याच्या प्रकरणाची चौकशी नव्याने करण्यात येणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी सांगितले.
चाळीसगाव गाव येथील माजी सैनिक सोनू एका कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत होते. २ जून, २०१६ रोजी उन्मेष पाटील काही गुंडांना घेऊन घरात घुसले. त्यांनी तलवारीने केलेल्या हल्लात महाजन गंभीर जखमी झाले. चाळीसगाव पोलिसांनी महाजन यांच्यावरच उलटे गुन्हे दाखल करून आरोपींना संरक्षण देण्याचे काम केल्याचा आरोप महाजन यांच्या पत्नी मनीषा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबाबत केला होता.
महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने एफआयआर नोंदविण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर, पत्नी मनीषा महाजन यांचा जबाब ३० एप्रिल, २०१९ मध्ये चाळीसगाव पोलिसांनी नोंदविला. यात भाजपचे नेते उन्मेष पाटील यांच्यावर त्यांनी थेट आरोप केले. मात्र, तपास प्रलंबित ठेवला. केवळ राजकीय दबावापोटी कारवाईपासून दूर राहिलेल्या भाजपच्या नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत असल्याने आता गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणाच्या नव्याने चौकशीचे आदेश दिले.