मुंबई: अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणात अकोला शहरातील सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी भानुप्रताप मडावी आणि प्रणिता कराडे यांना निलंबित करण्यात आल्याची तसेच पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत केली. महिला व मुलींविषयक गुन्ह्यांच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.
अल्पवयीन मुलगी हरविल्याची नोंद मुलीच्या पालकांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात नोंदविली होती. या प्रकरणात तेथील तपास अधिकाऱ्यांनी गतीने तपास केला नाही. पालकांना अतिशय अवमानजनक वागणूक दिली. मुलीच्या काळजीमुळे पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने तपासातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करुन कडक शब्दात ताशेरे ओढले.
आज मुलीच्या पालकांनी मंत्रालयात गृहमंत्र्यांना भेटून मुलीच्या तपास प्रकरणातील पोलीसांबाबत तक्रार केली. त्यावर गृहमंत्र्यांनी तातडीने सर्व माहिती घेऊन आणि विभागाच्या अपर मुख्य सचिवांना बोलावून चर्चा केली. गृहमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि तसे सभागृहात जाहीर केले. महिलांविषयक गुन्ह्यांच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा राज्यात खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले