गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:40+5:302021-03-26T04:07:40+5:30
माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची ''जनहित'' याचिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशी करावी माजी पोलीस आयुक्त परमवीर ...
माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची ''जनहित'' याचिका
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशी करावी
माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची जनहित याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल केली.
पुरावे नष्ट करण्यापूर्वी अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट गैरवर्तनाबद्दल त्वरित, नि:पक्षपाती चौकशी करण्याची मागणी परमवीर सिंह यांनी याचिकेद्वारे केली.
अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका परमवीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परमवीर सिंह यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले.
स्फोटक - कारप्रकरणी परमवीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करत गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर परमवीर यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राजकारण्यांच्या फायद्यासाठी केल्या जात नाहीत, असे सिंह यांनी याचिकेत नमूद केले.
दरम्यान, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अहवाल आणि त्याच्याशी संबंधित गृह विभागाची फाईल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी अंतरिम मागणी सिंह यांनी केली. तसेच देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही फूटेज स्वतंत्र तपास यंत्रणेला ताब्यात घेण्याचे निर्देशही द्यावेत, अशीही मागणी सिंह यांनी केली.
देशमुख यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांच्या घरी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्याबरोबर बैठक घेतली. त्या दोघांना दरमहा १०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. २४-२५ ऑगस्ट २०२० या कालावधीत रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराची जाणीव पोलीस महासंचालकांना दिली होती, असे सिंह यांनी याचिकेत नमूद केले.
या याचिकेत राज्य सरकार, केंद्र सरकार, सीबीआय व अनिल देशमुख यांना प्रतिवादी करण्यात आले.
* अनिल देशमुख, परमवीर सिंह आणि वाझे यांची संपत्ती जप्त करा - जनहित याचिका
अनिल देशमुख यांच्याबरोबरच परमवीर सिंह व त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारी आणखी एक जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले घनश्याम उपाध्याय यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. तसेच अनिल देशमुख यांच्यासह, परमवीर सिंह आणि सचिन वाझेची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करावी, अशी मागणीही या याचिकेद्वारे केली.
...........................