Join us

गृहमंत्री अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार नाट्य आता उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:06 AM

आरोपांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकागृहमंत्री अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार नाट्य आता उच्च न्यायालयातचौकशीसाठी ...

आरोपांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

गृहमंत्री अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार नाट्य आता उच्च न्यायालयात

चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमा : उच्च न्यायालयात याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकताच भ्रष्टाचाराचा आरोप केला. या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी करावी, यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे

माजी मुंबई पोलीस आयुक्त व विद्यमान गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांनी यामध्ये निभावलेल्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी याचिका वकील जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्याशिवाय पुणेस्थित हेमंत पाटील यांनीही अशाच स्वरूपाची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. परंतु, या दोन्ही याचिकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

अनिल देशमुख हे गृहमंत्र्याचे पद संभाळण्याकरिता विश्वासार्ह नसल्याचे उघडकीस आले आहे. ते आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस अधिकाऱ्यांना सामान्य माणसांना आणि व्यावसायिकांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश देत, असे जयश्री पाटील यांनी याचिकेत नमूद केले.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवले आहे. देशमुख हे वारंवार पोलीस तपासात हस्तक्षेप करत. पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार बोलावून त्यांना तपास कसा करायचा, याबाबत सूचना देत असत, असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.

देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. मुंबईतील १,७५० बार, रेस्टॉरंटकडून महिना ४० ते ५० लाख रुपये मिळविण्याचे व उर्वरित रक्कम अन्य स्रोतांकडून मिळविण्यास सांगितले हाेते. देशमुख यांच्याविरोधात सिंह यांनी गुन्हा नोंदविला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फौजदारी दंडसंहिता कलम १५४अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा अधिकार आहे. मात्र, सिंह यांनी याप्रकरणात काही कारवाई का केली नाही, याचाही तपास करायला हवे, असे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे.

* तपास जलद सुरू करावा, अन्यथा पुरवाे नष्ट हाेतील !

ज्या ठिकाणी हा कट रचला गेला, तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे निर्देश तपास अधिकाऱ्यांना द्यावेत. अन्यथा ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मलबार हिल पोलीस ठाण्यात याबाबत पोलीस तक्रार केली. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. त्यामुळे पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही पाटील यांनी केली. साेबतच तपास जलदगतीने सुरू करण्यात आला नाही तर पुरावे नष्ट करण्याची भीतीही पाटील यांनी व्यक्त केली, तर अशीच मागणी करणारी याचिका पुण्याचे हेमंत पाटील यांनीही उच्च न्यायालयात केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र तपास यंत्रणा नेमून या तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा, तसेच अनिल देशमुख, परमबीर सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आयपीसी कलम १६६ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही पाटील यांनी केली.

...........................