- परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब : महाराष्ट्रात राजकीय भूकंप; अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ ईयर’च्या पुरस्कार सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली ही नियमित प्रशासकीय नसून काही अक्षम्य गोष्टी घडल्याने केली असल्याचे म्हटले होते. या मुद्यावरून खवळलेल्या परमबीर सिंग यांनी शनिवारी थेट गृहमंत्र्यांवरच १०० कोटी रुपयांच्या खंडणीखोरीचा आरोप करून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला.
मुंबईच्या आयुक्तपदावरून तीन दिवसांपूर्वी उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी शनिवारी या प्रकरणाबाबत मौन सोडले.
गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, त्यासाठी त्यांना बंगल्यावर बोलावून सूचना दिल्या होत्या, असा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहून त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. हे पत्र त्यांनी राज्यपालांच्या कार्यालयालाही धाडले आहे.
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ ईयर’ पुरस्कार सोहळ्यात गृहमंत्री देशमुख यांनी जाहीर मुलाखत दिली होती. स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडून गंभीर चुका झाल्याने त्यांना आयुक्तपदावरून हलविण्यात आले. ही नियमित बदली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले होते. परमबीर सिंग यांनी तोच धागा पकडून गृहमंत्री व त्यांचे सचिव संजीव पलांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत एकूण १७५० बार व रेस्टॉरंट आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतल्यास महिन्याला ४०-५० कोटी जमतील आणि अन्य माध्यमांतून उर्वरित पैसे मिळविण्याची सूचना त्यांनी केली होती, असे सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.
वसुलीच्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ पत्राच्या शेवटी १६ व १९ मार्चला समाजसेवा शाखेचे सहायक आयुक्त संजय पाटील यांच्याशी झालेल्या व्हाॅट्सॲप चॅटचे पुरावे जोडले आहेत.
ँटेलिया प्रकरणात ब्रिफिंग देताना एका बैठकीत मी आपल्याला गृहमंत्र्यांची गैरवर्तणूक निदर्शनात आणून दिली होती. त्याची कल्पना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही दिली होती, असेही सिंग यांनी म्हटले आहे.
डेलकरप्रकरणी दबाव
खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांनी आपल्यावर सातत्याने दबाव आणला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदारे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता तपासातून दिसते आहे. या कारवाईपासून स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा खोटा आरोप केला आहे.
- अनिल देशमुख, गृहमंत्री