Navneet Rana: नवनीत राणांना कोठडीत हीन वागणूक? नेमकं काय घडलं? गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:42 PM2022-04-26T12:42:37+5:302022-04-26T12:43:08+5:30
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस कोठडीत त्यांच्यासोबत हीन वागणूक झाल्याचा आरोप केल्याप्रकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई-
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस कोठडीत त्यांच्यासोबत हीन वागणूक झाल्याचा आरोप केल्याप्रकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस कोठडीत त्यांच्यासोबत छळ आणि हीन दर्जाची वागणूक दिली गेल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी याबाबत पत्र लिहून तथ्यावर आधारित माहिती मागवली आहे आणि राज्य सरकार याची संपूर्ण माहिती लवकरच पाठवेल, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.
मुंबई पोलिसांनी कोठडीत आपण अनुसुचित जातीचे असल्यानं प्यायला पाणी देखील दिलं नाही. तसंच वॉशरुमला देखील जाऊ दिलं नाही, असा आरोप कोठडीत असलेल्या नवनीत राणा यांनी केली आहे. याबाबल दिलीप वळसे पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. "खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात मी स्वत: चौकशी केली आणि तसं काही घडलं अशी वस्तूस्थिती नाही. त्यांच्यासोबत कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नाही. राणा दाम्पत्यावर आतापर्यंत झालेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे. याबाबत मी अधिक बोलणार नाही. कारण त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत तथ्यावर आधारित माहिती आमच्याकडे मागितली आहे. ती माहिती लवरकच पाठवण्यात येईल", असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
राज ठाकरेंच्या सभेचा निर्णय दोन दिवसांत
औरंगाबादमध्ये १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नसल्याचं विचारण्यात आलं असता वळसे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली. येत्या दोन दिवसांत राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीबाबतचा निर्णय दिला जाईल. औरंगाबादचे पोलीस आयुक्त याबाबतचा निर्णय घेतली. सदर ठिकाणची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन ते निर्णय घेतली. सभेला परवानगी द्यायची की नाही ते पोलीस आयुक्त ठरवतील. राज्य सरकार ठरवणार नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.