... म्हणून आधी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 03:16 PM2021-03-21T15:16:01+5:302021-03-21T15:18:23+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, नाइट क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.
नागपूर : मुंबईची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार यांनी संपूर्ण प्रकरणाची चांगल्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी, असा सल्ला राज्य सरकारला दिला असल्याचं म्हटलं आहे. मात्र, पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषद घेऊन आपली भूमिका मांडली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, नाइट क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तुम्हीही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. खरंच असं काही टार्गेट मुंबई पोलिसांना असतं का? असा प्रश्न एका पत्रकारानं शरद पवार यांना विचारला. त्यानतंर पवार हसले आणि म्हणाले "हे तुम्ही मला काय मुंबई पोलिसांच्या कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला किंवा माजी अधिकाऱ्याला विचारलं तर तेही हसतील, असं पवार म्हणाले. तसेच, हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी करण्याचा सल्ला दिल्याचेही पवार यांनी सांगितलं. त्यानंतर, फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आधी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या, मगच चौकशी करा, असे फडणवीय यांनी म्हटले.
या सरकारचे निर्माते शरद पवार आहेत, त्यामुळे सरकारला वाचविणे हे त्यांचे कामच. मात्र, या लेटरबॉम्बची चौकशी झाली पाहिजे. अगोदर गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा, मग चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत, ते केवळ परमवीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी 15-20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का, तशी निष्पक्ष चौकशी होऊ शकेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्रालय देशमुख चालवितात की सेनेचे अनिल परब हेदेखील स्पष्ट व्हावे, असे फडणवीस म्हणाले.
अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 21, 2021
हे प्रकरण अतिशय गंभीर आहे.
त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही : देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis
याअगोदर तत्कालीन महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी इंटेलिजन्स आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मदतीने नियमानुसार अहवाल तयार केला जात. पोलीस बदल्यांचे मोठे रॅकेट समोर आले होते. त्याचे पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर केले. मात्र, त्या अहवालाला मुख्यमंत्र्यांनी गंभीरतेने घेतले नाही. तो अहवाल गृहमंत्र्यांकडे वर्ग करण्यात आला. गृहमंत्र्यांनी शुक्ला यांच्यावरच कारवाई केली आणि ज्यांच्यावर ठपका लावण्यात आला होता त्यांना तेथेच पदस्थापना देण्यात आली. निलंबित अधिकाऱ्याला पदस्थापना देताना एक्सिक्यूटिव्ह पद देता येत नाही, याची मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना कल्पना नव्हती का?. परमबीर सिंग यांच्या समितीने वाझे यांना परत सेवेत घेतले, मात्र सरकारच्या निर्देशानुसार, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानेच त्यांनी असे केल्याचेही फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
राजीनाम्याबद्दल शरद पवार म्हणतात
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या पत्राला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्राच्या माध्यमातून केलेले आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत अनिल देशमुख यांचीही बाजू जाणून घेतली पाहिजे. त्यांच्या राजीनाम्याबाबत आम्ही सर्वांशी बोलून निर्णय घेऊ. याबाबतचा निर्णय हा उद्यापर्यंत होऊ शकेल. असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील.