लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या चौकशीतून काही गोष्टी पुढे आल्या आहेत. या बाबी माफ करण्यालायक नाहीत अक्षम्य गोष्टी आहेत. त्यामुळे चौकशीत बाधा येऊ नये यासाठीच मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली केली आहे. ही नियमित प्रशासकीय बदली नाही, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी अँटेलिया स्फोटक प्रकरणी पोलिसांकडून चुका झाल्याची स्पष्ट कबुली दिली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०' सोहळ्यात घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अँटेलिया स्फोटक प्रकरण, मुंबई पोलिस आयुक्तांची बदली आणि सचिन वाझे प्रकरणावर थेट भाष्य केले. लोकमत एडीटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि पत्रकार प्रसन्न जोशी यांनी गृहमंत्र्यांशी संवाद साधला. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय तसेच आयुक्तांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून गंभीर चुका घडल्या आहेत. त्या माफ करण्यालायक नाहीत म्हणूनच पोलीस आयुक्त पदावरून परमवीर सिंह यांची बदली केल्याचे गृहमंत्री देशमुख म्हणाले.
एटीएस आणि एनआयए या दोन्ही व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्या यंत्रणा आहेत. ते सत्य शोधून काढतील. इथे फार बोलता येणार नाही. पण, वाझेच्या चौकशीत अनेक विषय पुढे येतील. स्काॅर्पिओ, इनोव्हा, पोलीस आयुक्त कार्यालयातील सहभाग अशा सर्व चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांना सोडले जाणार नाही असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
सीबीआय पाठोपाठ आता 'एनआयए'च्या माध्यमातून राज्याच्या कारभारात हस्तक्षेप केला जात असल्याच्या आरोपाबाबत गृहमंत्री म्हणाले की, देशभरात जिथे स्फोटकांचा विषय येतो तिथे एनआयएला चौकशी करावीच लागते. मात्र, यापूर्वी सुशांतसिंह प्रकरणात राज्याचे पोलीस चांगले काम करत होते. आता आठ महिने झाले तरी हत्या होती की आत्महत्या हे सीबीआय अद्याप सांगू शकली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. राष्ट्रीय स्तरावरच्या यंत्रणांना काही ठिकाणी यश मिळते, कुठे मिळत नाही. आता मुंबई पोलिसांमध्ये घटना घडली आहे. त्यामध्ये जो दोषी आहे ते शोधून काढतील. महाराष्ट्र एटीएसदेखील चांगला तपास करत आहेत, ते सुद्धा दोषी हुडकून काढतील, अशी खात्री गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.
यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, वस्त्राेद्याेगमंत्री अस्लम शेख, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आमदार विक्रम काळे, अभिजीत वंजारी, विकास ठाकरे, व्यावसायिक किरीट भन्साळी, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, शेमारूचे संदीप गुप्ता, डाॅ. एस. नटराजन आदी मान्यवर उपस्थित होते.
* फडणवीस यांचा 'तो' आरोप राजकीय
वाझे याला पोलीस दलात घेण्यासाठी दबाव आला होता, हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप राजकीय आहे. त्याची त्यांना स्वतःला कल्पना आहे. सहायक पोलीस निरीक्षकाला परत घेण्यासारखे विषय आयुक्त स्तरावरील पाच सदस्यांच्या समितीत घेतले जातात. त्याचे प्रस्ताव राज्य सरकारपर्यंत येत नाहीत.
* भाजपवाल्यांची मुंगेरीलाल के हसीन सपने
सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसावे लागेल, असा विचारही भाजपच्या नेत्यांनी केला नव्हता. आजही अनेक नेते अस्वस्थ आहेत. त्यांना सत्तेची स्वप्ने पडतात. पण, मुंगेरीलाल के हसीन सपने पाहणे त्यांनी बंद करावे. राज्यात सत्ता बदल होईल म्हणून तारखा दिल्या जातात, पण तसे काही घडणार नाही. आमदार पळून जातील म्हणून सरकार पडेल वगैरे म्हणावे लागते, असे अनेक भाजप नेते आम्हाला खासगीत सांगत असतात.
* पवारांचा आदेश असेपर्यंत गृहमंत्री
देशमुख यांचे गृहमंत्रिपद पुढील वर्षभर कायम राहणार का? या प्रश्नावर जोपर्यंत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेश आहे, तोपर्यंत मी गृहमंत्री राहणार आहे. गृहमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, असे त्यांनी अलीकडेच दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
* चंद्रकात पाटील आणि चमेलीचे तेल
आणखी दोन जण जाणार आहेत, त्यात एक मंत्री असेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला. यावर, चंद्रकांत पाटील तेल लावून येतात आणि काहीतरी वक्तव्ये करतात. कोणत्या चमेलीचे तेल लावतात कुणास ठावूक, अशा शब्दात गृहमंत्री देशमुख यांनी चंद्रकांत पाटील यांची फिरकी घेतली.
* गडचिरोलीच्या दुर्गम भागात लक्ष्मीपूजन
देशाचे पंतप्रधान दिवाळीच्या दिवशी सीमेवर जातात, आपण दिवाळी कुठे साजरी करता? या प्रश्नावर गृहमंत्री देशमुख म्हणाले की, गडचिरोलीपासून ३०० किलोमीटर दूरवर दुर्गम भागात पातागुडम आहे. ते राज्याचे शेवटचे पोलीस स्टेशन आहे. यावर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनच्या दिवशी सपत्नीक तिथे होतो. आपले पोलिस, सीआरपीएफ आणि एसआरपीएफ जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
....