'गृहमंत्र्यांना कॅबिनेट बैठकीसाठी गुपचूप मागच्या दारानं यावं लागतं, ही मोठी नामुष्की'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 08:29 AM2021-03-25T08:29:56+5:302021-03-25T08:38:23+5:30

मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे मागच्या दाराने आल्याचं भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.

'Home ministers have to come secretly through the back door for cabinet meetings, it's a big disgrace', atul bhatkhalkar on anil deshmukh | 'गृहमंत्र्यांना कॅबिनेट बैठकीसाठी गुपचूप मागच्या दारानं यावं लागतं, ही मोठी नामुष्की'

'गृहमंत्र्यांना कॅबिनेट बैठकीसाठी गुपचूप मागच्या दारानं यावं लागतं, ही मोठी नामुष्की'

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे मागच्या दाराने आल्याचं भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ एका कारमध्ये स्फोटकं आढळल्यापासून राज्यात स्फोटकं घडामोडी घडण्यास सुरुवात झाली. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याच विरोधात पुरावे सापडल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं. वाझेंवरून भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला धारेवर धरलं. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दूर करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कॅबिनेटची बैठक झाली. मात्र, या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख मागच्या दाराने पोहोचल्याचे भाजपा नेत्यानं म्हटलंय. 

मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे मागच्या दाराने आल्याचं भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. खंडणीखोरिचा आरोप असलेल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कॅबिनेट बैठकीसाठी गपचूप मागच्या दाराने यावं लागतं यापेक्षा अधिक नामुष्की काय असू शकेल?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. जनतेला तोंड दाखवू न शकणारा गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अजूनही खुर्चीवर आहे, कारण वसुलीत सगळ्यांचा वाटा आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून परमबीर सिंग यांनी एकच खळबळ उडवून दिली. परमबीर सिंग यांच्या पत्राचा मुद्दा संसदेतही गाजला. भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांनीदेखील पत्रकार परिषदा घेत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारनं एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांकडून होत असलेले आरोप खोडून काढण्याची गरज असल्याची भूमिका आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. 

राष्ट्रवादीचाही दुजोरा

वाझे प्रकरण आणि परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे विरोधकांकडून सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर हल्ले होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचे आरोप खोडून त्यांना उघडं पाडायला हवं. विरोधकांवर तुटून पडायला असं मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले. सर्वांनी एकत्रित येऊन लढण्याची गरज असल्याचंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. याला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनीदेखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी आता महाविकास आघाडी सरसावण्याची शक्यता आहे.

मी निर्दोष - अनिल देशमुख

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर त्यांची बाजू मांडली. माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मी निर्दोष आहे. माझ्यावरील आरोप धादांत खोटे आहेत, असं देशमुख यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडतोय का? त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? अधिकारी फोन टॅप करणार असतील, तर मग मंत्र्यांनी कामं कशी करायची?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

Web Title: 'Home ministers have to come secretly through the back door for cabinet meetings, it's a big disgrace', atul bhatkhalkar on anil deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.