गृहमंत्र्यांच्या चौकशीसाठी न्या. चांदीवाल यांची समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 07:28 AM2021-03-31T07:28:10+5:302021-03-31T07:29:12+5:30
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व सध्या पोलीस महासंचालक (गृहरक्षक दल) असलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती करणार आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व सध्या पोलीस महासंचालक (गृहरक्षक दल) असलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती करणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी या बाबतचा आदेश काढला. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखालील समिती सहा महिन्यांत शासनाला अहवाल सादर करेल. परमबीर सिंग यांनी २० मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून देशमुख यांच्यावर काही आरोप केले होते. देशमुख यांनी बार आणि रेस्टॉरंटकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्यास सचिन वाझे यांना सांगितल्याचा दावा केला होता.
कोण आहेत न्या. चांदीवाल?
न्या. कैलास उत्तमचंद चांदीवाल हे मूळचे औरंगाबादचे असून, मुंबई उच्च न्यायालयात ते साडेसहा वर्षे न्यायमूर्ती होते. सध्या ते महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ते रेराच्या अपिलीय न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती होते. शिर्डी संस्थानच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदीही ते राहिले आहेत.