घरांची विक्री ३३ ते ३६ टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे
मुंबई : कोरोना संक्रमणाच्या काळात ढासळू लागलेले गृह खरेदीचे इमले आता सावरताना दिसत असून आगामी उत्सवी काळात घरांचे खरेदी विक्री व्यवहार जवळपास ३३ ते ३६ टक्क्यांनी वाढतील असा अंदाज आहे. सप्टेंबर अखेरीस संपलेल्या तिमाहीत मुंबई महानगर क्षेत्रात ९,२०० घरांची विक्री झाली होती. ती आँक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत १२,५०० पर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये मुंबई महानगरांतील व्यवहार वृध्दीचा वेग जास्त असेल.
अँनराँक प्राँपर्टीज या सल्लागार संस्थेने गृहनिर्माण क्षेत्रातील संभाव्य वाटचालीचा अहवाल तयार केला असून त्यातून ही माहिती हाती आली आहे. पुण्यातही गेल्या तिमाहीत ४,८५० घरांची विक्री झाली होती. त्यातही ३४ टक्क्यांनी वाढ अपेक्षित असल्याचे हा अहवाल सांगतो. हैद्राबाद (२० ते २४), बंगळूरू (३० ते ३५), दिल्ली (२७ ते ३१), चेन्नई (२० ते २५) आणि कोलकत्ता (३०) असा इतर शहरांतील वाढीचा वेग असेल असे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. यंदा कोरोनामुळे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घरांची विक्री घटली होती. त्यामुळे यंदा ती वाढ जास्त दिसत आहे. त्याशिवाय महाराष्ट्र सरकारने डिसेंबर अखेरीपर्यंत ३ टक्के मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली आहे. गृह कर्जांच्या व्याज दरात विक्रमी घट झाली आहे. आर्थिक कोंडी झालेले विकासक विविध सवलती जाहीर करत असल्याने घरांच्या किंमतीसुध्दा कमी झाल्या आहेत. गृह खरेदीसाठी हा योग्य काळ असल्याने आर्थिकदृष्ट्या सबळ असलेल आणि गेल्या काही महिन्यांपासून गृह खरेदीच्या प्रतीक्षेत असलेले ग्राहक घर घेण्यासाठी उत्सूक आहेत. त्यामुळे नवरात्र, दसरा, दिवाळीच्या मुहुर्तावर गृह खरेदीला चालना मिळेल असे सांगितले जात आहे.
२०१६-१७ साली नोटबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे उत्सव काळातील घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांना उतरती कळा लागली होती. तर, गेल्या वर्षी उत्सवांच्या काळात घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये ५ ते १० टक्के वाढ झाली होती. यंदा कोरोना संकटाचे ढग कायम असतानाही त्यात वाढ होणार असल्याचे हा अहवाल सांगतो. सात प्रमुख शहरांमध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ४५,२०० घरांची विक्री झाली होती. गेल्या तिमाहीत ती २९,५०० पर्यंत खाली घसरली होती. पुढील तिमाहीत त्यात सुमारे ३५ टक्के वाढ होईल असा अंदाज आहे.