लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घर खरेदी करताना अनेकदा विकासक ग्राहकांशी करारातील कायदेशीर व क्लिष्ट भाषेचा उपयोग करतो. घराच्या क्षेत्रफळाच्या विविध व्याख्या, बांधकाम सुरू करण्यास दिले जाणारे प्रमाणपत्र या मधील भाषा अनेकदा उच्चशिक्षित ग्राहकांना देखील समजून येत नाही. यामुळे या सर्व प्रक्रियेत बदल घडविण्याची गरज आहे. घर खरेदी करताना सर्व दस्तावेज आणि व्यवहार ग्राहकांना समजेल अशा भाषेतच असणे गरजेचे आहे. तसेच विकासक महारेराच्या संकेतस्थळावर पुरवत असलेली माहिती परिपूर्ण व अद्ययावत असायला हवी, असे मत महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी व्यक्त केले.
महारेरा सलोखा मंचच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी महारेराच्या बीकेसी येथील कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात नारेडको, क्रेडाई, एमसीएचआय या विकासकांच्या संघटना आणि मुंबई ग्राहक पंचायतीचे महारेरा सलोखा मंचचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड शिरीष देशपांडे यांनी सांगितले की ग्राहक आणि विकासक यांच्यातील वाद सलोख्याने आणि दोन्ही बाजूच्या संमतीने सोडविता यावा यासाठी महारेरा सलोखा मंचची स्थापना करण्यात आली. मुंबई-पुण्यात महारेराचे २५ हून अधिक सलोखा मंच कार्यरत आहेत. यातून ग्राहकांच्या अनेक तक्रारी समजुतीने सोडविल्या गेल्या आहेत.
तसेच नारेडकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, सलोखा मंचाद्वारे ग्राहकांच्या तक्रारींचे विकासकाच्या उपस्थितीत निवारण करण्यात आनंद मिळतो.