लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे या शहरांमध्ये २०२० च्या तुलनेत २०२१ च्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये घर खरेदीत वाढ दिसून आली आहे. भारतातील सात शहरांमध्ये २०२१ च्या पहिल्या पाच महिन्यांत १ लाख ३२ हजार ८१८ घरांची खरेदी झाली, तर २०२० च्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये १ लाख ८ हजार १९९ घरांची खरेदी झाली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षी घर खरेदीत २३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्रॉप इक्विटी या बांधकाम क्षेत्रातील संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षातली जास्तीत जास्त खरेदी ही १५ एप्रिलपर्यंत नोंदविण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात बंगळुरूमध्ये १६ टक्क्यांनी, चेन्नईमध्ये ४० टक्क्यांनी, हैदराबादमध्ये ३९ टक्क्यांनी, मुंबई महानगर प्रदेशात २९ टक्क्यांनी आणि पुण्यात ३४ टक्क्यांनी घर खरेदीत वाढ झाली; परंतु कोलकाता आणि दिल्ली एनसीआर शहरांमध्ये घर खरेदीत ११ आणि २० टक्क्यांनी घट दिसून आली.
२०२० या वर्षात मार्च महिन्यातच कोरोनाने भारतात शिरकाव केल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यामुळे बांधकाम क्षेत्र एप्रिल आणि मे महिन्यात ठप्प झाले होते. यानंतर नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली तरीदेखील घर खरेदीला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. यानंतर विविध सवलती, योजना, तसेच लसीकरण प्रक्रियेने घर खरेदीला चालना मिळाली.
नवीन प्रकल्पांमध्ये मात्र घट
घर खरेदीमध्ये वाढ झाली असली तरीदेखील बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर प्रदेश व पुणे या शहरांमध्ये नवीन प्रकल्प बाजारात येण्यात घट झाली आहे; परंतु चेन्नई आणि दिल्ली या शहरांमध्ये नवीन प्रकल्प बाजारात येण्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.