मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे कोसळलेले मुंबई शहरांतील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार राज्य सरकारने केलेली मुद्रांक शुल्कातील कपात आणि विकासकांकडून दिल्या गेलेल्या सवलतींमुळे वधारले आहेत. २०१९च्या तुलनेत २०२० सालातील सप्टेंबर महिन्यात चक्क जास्त व्यवहारांची दस्त नोंदणी झाली होती. दसरा-दिवाळीच्या या शुभ मुहूर्तांवर ही खरेदी उच्चांक गाठण्याची चिन्हे आहेत. दस्त नोंदणी वाढली असली तरी मुद्रांक शुल्कातील सवलतींमुळे सरकारच्या तिजोरीतील महसुलात मात्र लक्षणीय घट झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात तब्बल ५ हजार ५९७ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मुंबईत झाले आहेत. त्यात नव्या-जुन्या घरांसह, जमीन, गोडाऊन, व्यावसायिक मालमत्तांचाही समावेश आहे. उत्सव काळाच्या पार्श्वभूमीवर घरांच्या खरेदी-विक्रीला चालना मिळत असल्याने बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारला या दस्त नोंदणीतून वर्षाअखेरीस ३० हजार कोटींचा महसूल मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, सहा महिन्यांत फक्त ५ हजार ४०० कोटी रुपये प्राप्त झाले असून, पुढील सहा महिने सवलतींचे आहेत. महसूल एका मर्यादेपेक्षा जास्त वाढणार नाही, असे मत मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
उत्सव काळात मिळतोय लाभसप्टेंबर महिन्यात तब्बल ५ हजार ५९७ मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मुंबईत झाले आहेत. त्यात नव्या-जुन्या घरांसह, जमीन, गोडाऊन, व्यावसायिक मालमत्तांचाही समावेश आहे. उत्सव काळात घरांच्या खरेदी-विक्रीला चालना मिळत आहे.
खरेदीत वाढ निश्चितगृहकर्जाच्या व्याजदरांमध्ये अभूतपूर्व कपात झाली असून घरांचे विविध पर्यायही उपलब्ध आहेत. अनेक अनिवासी भारतीय गृहखरेदीच्या प्रयत्नात असल्याने या व्यवहारांत नक्कीच वाढ होईल. - निरंजन हिरानंदानी, अध्यक्ष,नरेडको
विक्रमी वाढ होणारडिसेंबरपूर्वीच्या उत्सव काळात अनेक कुटुंब आपले गृहखरेदीचे स्वप्न साकार करतील. गेल्या सहा महिन्यांत रखडलेले व्यवहारही या कालावधीत मार्गी लागतील. विक्रमी वाढ होईल. - बोमन इराणी, चेअरमन, रुस्तमजी ग्रुप
मुद्रांक शुल्कात सवलत दिल्याने महसूल अवघडमालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढताना दिसत असले तरी डिसेंबरपर्यंत तीन आणि त्यापुढे मार्च अखेरीपर्यंत मुद्रांक शुल्कात दोन टक्के सवलत जाहीर झाल्यामुळे अपेक्षित महसूल मिळणे अवघड आहे. - उदयराज चव्हाण, सहजिल्हा निबंधक, मुंबई शहर