होम क्वारंटाइन पोलीस अधिकाऱ्यांनाच जुंपले ड्युटीला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:36 AM2020-04-18T00:36:58+5:302020-04-18T00:37:09+5:30
आरसीएफ पोलीस ठाणे; शिक्के मारलेल्यांना कार्यालयात काम
जमीर काझी
मुंबई : कोविड - १९ चा देशात सर्वाधिक कहर असलेल्या मुंबईत त्याच्या अटकावासाठी प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्नशील असताना दुसरीकडे कोरोना संशयित म्हणून होम क्वारंटाईन केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना ड्युटी देण्याचा अजब प्रकार आरसीएफ पोलीस ठाण्यात घडला आहे. संबाधितांनी त्याविरुद्ध उघडपणे संताप व्यक्त केल्यानंतर प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी त्यांना ड्युटीवरून हटवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.
आरसीएफ पोलीस वसाहतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गुरुवारपासून पुर्ण इमारत सील करण्यात आली आहे. याच बिल्डिंंगच्या आवारात आरसीएफ पोलीस ठाणे आहे. तेथील रूग्णांच्या संपर्कात आल्याने ठाण्यातील सात अंमलदार आणि तीन आधिकाºयांची तपासणी करून त्यांना होम क्वारटाईन करण्यात आले. त्यांच्या हातावर त्याबाबत शिक्केही मारण्यात आले. त्यापैकी काही अधिकारी इमारतीत रहात असल्याने त्यांना शुक्रवारी पोलीस ठाण्यात चक्क ड्युटीवर बोलवण्यात आले.
‘आम्ही पॉझिटिव्ह असल्यास आणि आमच्यामुळे अन्य पोलीस व याठिकाणी येणारे नागरिक बाधित झाल्यास त्याला जबाबदार कोण’, अशी विचारणा करीत या पोलीसांनी संताप व्यक्त केला.
संबंधित अधिकाºयांना होम क्वॉरटाइन केले असल्याचे रात्रीच नियमानुसार संदेश देऊन कळविण्यात आले होते. मात्र ते न पाहता पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे संबधितांना आॅफिस ड्युटी लावण्यात आल्या. अखेर चूक लक्षात आल्याने वरिष्ठांनी दुपारनंतर संबंधिताच्या जागेवर इतरांना नेमत त्यांना घरी जाण्यास मोकळीक दिली. या अजब प्रकाराची चर्चा दिवसभर पोलीस वर्तुळात सुरु राहिली.
वरिष्ठांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
या असंवेदनशील प्रकाराबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, उपायुक्त यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते उपायुक्त (आॅपरेशन ) प्रणव अशोक यांना संबंधित ड्युटी चार्ट आपल्याकडे उपलब्ध असल्याचे सांगितल्यावरही त्यांनी काही नाही, असे सांगत त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.