संदीप शिंदे
मुंबई : तीन वर्षांपूर्वी सरोज वैद्य यांनी घोडबंदर रोड येथील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या गृहप्रकल्पात ८३ लाख रुपये (सर्व समावेशक) किंमतीत वन बीएचएचके फ्लॅट खरेदी केला. महिन्याकाठी त्यांना १८ हजार रुपये भाडेही मिळते. आता कोरोनामुळे अडचणीत आलेला व्यवसाय सावरण्यासाठी त्यांना हे घर विकायचे आहे. मात्र, विकासकच या भागातली नवी घरे सर्व समावेशक किंमतींसह ६५ ते ६८ लाखांना विकत असल्याने वैद्य यांच्या घराच्या ‘रिसेल’साठी (पुनर्खरेदी) ६५ लाखांची बोली लावण्यासही कुणी तयार नाही. मालमत्तेतल्या गुंतवणूकीतून केवळ वैद्यच नव्हे तर शेकडो जणांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची चिन्हे आहेत.
कोरोना दाखल होण्यापूर्वीच बांधकाम व्यवसायावर मंदीचे ढग जमा झाले होते. कोरोनामुळे ते संकट अधिक गहिरे झाले आहे. लाँकडाऊनच्या झळा समाजातील प्रत्येक घटकाला सोसाव्या लागत असल्याने घरांची खरेदी विक्रीसुध्दा ढेपाळली आहे. गृह कर्जाचे व्याजदर कमी झाले असले आणि बांधकाम व्यावसायिकांनी घरांच्या किंमती कमी करण्याची तयारी दाखवली असली तरी गृहविक्रीच्या बाजारात तेजी येण्याची चिन्हे तूर्त दिसत नाहीत. त्यातच केंद्रीय मंत्र्यांपासून नामांकित बँकर्सनी घरांच्या किंमती कमी करण्याच्या सूचना विकासकांना दिल्याने संभाव्य ग्राहकांनी वेट अँण्ड वाँचची भूमिका घेतली आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात नवी घरांच्या खरेदी विक्रीचे जेवढे व्यवहार होतात. त्याच्या ३५ ते ४० टक्के व्यवहार घरांच्या पुनर्खरेदीचे होत असतात. परंतु, दोन्ही प्रकारच्या घरांच्या खरेदी विक्रीला ग्रहण लागले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच बांधकाम पूर्ण झालेली सुमारे एक लाख घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. तर, सध्या बांधकाम सुरू असलेली तेवढीच घरे येत्या एक ते दीड वर्षांत बांधून पूर्ण होतील. त्यांच्या विक्रीचे मोठे आव्हान विकासकांसमोर आहे. नवीन घरांचा बाजारच कोसळल्याने रिसेल घरांच्या खरेदी विक्रीचे गणितही बिघडले आहे. येत्या काही महिन्यांत ती परिस्थिती आणखी चिघळेल अशी भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
.................................................
२० टक्के कमी किंमतीतही ग्राहक नाही
गेल्या एक वर्षापासूनच बांधकाम क्षेत्र अडचणीत होते. कोरोनामुळे त्या अडचणींमध्ये आणखी भर पडली. ज्या किंमतीत घरे विकत घेतली, त्यात दरवर्षी किमान तीन ते चार टक्के तरी वाढ होईल अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा असते. मात्र, आता किंमती २० टक्के कमी केल्यानंतरही या घरांची विक्री दृष्टिपथात नाही. मुळात सध्या घर खरेदीसाठी कुणी ग्राहक तयारच होत नाही. तसेच, विकासकच जर कमी किंमतीत घरे विकत असेल तर रिसेलसाठी कुणी फिरकणार नाही. त्यामुळे पैशांची अत्यंत निकड असलेल्या घर मालकांना घर विकण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल तर त्यांना मोठे नुकसान सोसावे लागेल अशी माहिती शांती रिअलिटर्सच्या रुचीत झुनझुनवाला यांनी दिली.
.................................
सोन्यातली गुंतवणूक परवडली असती
रिअल इस्टेट, शेअर मार्केट आणि सोन्यातील गुंतवणूकीवर भारतीयांचा भर असतो. सध्या सोने तेजीत असून अन्य दोन क्षेत्रांचा डोलारा कोसळला आहे. मालमत्तांमधील गुंतवणूक आर्थिकदृष्ट्या तोट्याची ठरत आहे. सोन्यातील गुंतवणूक परवडली असती असेही अनेकांना वाटत असेल असे मत प्राँपर्टी कन्लस्टंट चैतन्य प्रभूणे यांनी दिली.