अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घर सोडवेना
By admin | Published: August 2, 2015 04:43 AM2015-08-02T04:43:37+5:302015-08-02T04:43:37+5:30
म्हाडामार्फत करण्यात आलेल्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात मुंबईमध्ये १४ इमारती अतिधोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या डागडुजीचे काम म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती
मुंबई : म्हाडामार्फत करण्यात आलेल्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात मुंबईमध्ये १४ इमारती अतिधोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या डागडुजीचे काम म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत हाती घेण्यात आले असून ३२0 रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर २५ कुटुंबीयांनी स्वत:च पर्यायी घराची व्यवस्था केली आहे.
पावसाळ्यापूर्व सर्वेक्षणानंतर म्हाडाने अतिधोकादायक १४ इमारतींमधील ५३७ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार होते. परंतु रहिवाशांकडून म्हाडाला सहकार्य मिळत नसल्याने धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मंडळाने धोकादायक इमारतींचा भाग पाडून काही इमारतींना टेकू लावले आहेत तर काही इमारतींच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. दादर येथील फाळके रोडवरील मथुरा भवन इमारतीतील रहिवाशांचे विकासकाबरोबर मतभेद झाल्याने त्यांनी नवीन इमारतीतील गाळ्यांचा ताबा घेतलेला नसल्याने सुमारे १५ रहिवासी अद्यापही धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत. या रहिवाशांना स्वत: जागा खाली न केल्यास पोलीस बंदोबस्तात त्यांना इमारतीबाहेर काढण्याचा विचार म्हाडा अधिकारी करत आहेत.
१४ अतिधोकादायक इमारतींमध्ये ५३७ रहिवासी राहत होते. त्यांच्यापैकी २५ गाळेधारकांनी स्वत: गाळे खाली केले आहेत. तर ३२0 गाळेधारकांना गाळे खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत ७ गाळेधारकांना गाळे खाली करण्याची नोटीस देण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले. अतिधोकादायक इमारतींपैकी ९ इमारतींना टेकू लावण्यात आला असून उर्वरित इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)