लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यांत भारतातील ७ शहरांमध्ये एकूण १ लाख ५ हजार १८३ घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी पहिल्या तिमाहीत ८७ हजार २३६ घरांची विक्री झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा घर विक्रीचे प्रमाण वाढल्याने देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. प्रॉप इक्विटी या संशोधन संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. असे असले तरीदेखील घरांचे नवीन प्रकल्प बाजारात विक्रीसाठी येण्यामध्ये यंदा तब्बल ४० टक्क्यांनी घट दिसून आली आहे.
यंदा पहिल्या तीन महिन्यांत ५९ हजार ७३७ नवीन प्रकल्प देशभरात लॉन्च झाले. मात्र २०२० मध्ये याच काळात देशभरात १ लाख ३४३ नवीन प्रकल्प बाजारात विक्रीसाठी होते.
मागील वर्षीच्या तुलनेत घर खरेदीत बंगळुरूमध्ये १३ टक्क्यांनी, चेन्नईमध्ये २९ टक्क्यांनी, हैदराबादमध्ये १६ टक्क्यांनी, मुंबई महानगर क्षेत्रात २६ टक्क्यांनी, दिल्ली एनसीआर प्रदेशात ६ टक्क्यांनी आणि पुण्यात ३१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एकट्या कोलकाता शहरात मात्र घर खरेदीत २० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.
रिअल इस्टेट तज्ज्ञ राम नाईक यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी अंमलात आणलेल्या अनुकूल धोरणात्मक उपायांमुळे पहिल्या तिमाहीत घर विक्रीत वाढ झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे नागरिकांना राहण्यासाठी स्वतःचे घर असणे किती महत्त्वाचे आहे हे समजण्यास मदत झाली आहे. मध्यम उत्पन्न गटाने यंदा मोठ्या प्रमाणात गृह खरेदी केली.
तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक मोहनानी यांच्या मते मुद्रांक शुल्क सवलतीच्या शेवटच्या काळात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांनी घेतली. बँकेच्या कर्जाचे कमी व्याज दर, घरांच्या कमी व आकर्षक किमती आणि काही राज्यांतील मुद्रांक शुल्क कमी केल्यामुळे घर खरेदीत वाढ झाली. दरम्यान, दुसऱ्या लाटेमुळे या क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नवीन प्रकल्प बाजारात येणे कठीण झाले आहे.