कोरोना काळात घरांची खरेदी-विक्री जोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 04:13 AM2021-04-01T04:13:53+5:302021-04-01T04:14:55+5:30
एकीकडे गेले वर्षभर कोरोनामुळे उद्योगधंदे व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना, घरांची खरेदी-विक्री मात्र जोरात झाली आहे. राज्याच्या नोंदणी व शुल्क विभागाने गेल्या सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क पूर्वीच्या ५ टक्क्यांवरून तो २ टक्के केल्याने मालमत्तांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : एकीकडे गेले वर्षभर कोरोनामुळे उद्योगधंदे व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना, घरांची खरेदी-विक्री मात्र जोरात झाली आहे. राज्याच्या नोंदणी व शुल्क विभागाने गेल्या सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क पूर्वीच्या ५ टक्क्यांवरून तो २ टक्के केल्याने मालमत्तांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिकांनी या सवलतीचा फायदा घेत आधी स्टॅम्प ड्युटी भरली, मग नोंदणी केली. तर बांधकाम व्यावसायिकांच्या शिल्लक असलेल्या घरांची या काळात चांगली विक्री झाली.
ऑनलाइनला पसंती
भाड्यांवर देण्यात येणाऱ्या घरांच्या लिव्ह अँड लायसन्सच्या ऑनलाइन व्यवहारांना नागरिकांची जास्त पसंती असून रोज ३० ते ३५ सदर व्यवहार होतात, तर येथे प्रत्यक्ष १० ते १५ व्यवहार होतात. सर्व्हर डाउनची समस्या आली तरी ती तात्पुरती.
अंधेरी, बोरीवलीत केंद्र
नागरिकांच्या सोयीसाठी बोरीवली तालुक्यात सहदुय्यम निबंधकांची नऊ कार्यालये असून अंधेरी तालुक्यात सात कार्यालये आहेत.
विशेष म्हणजे तीन पाळ्यांत सकाळी ७ ते दुपारी २, सकाळी १० ते सायंकाळी ६ आणि दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत विविध ठिकाणी त्यांच्या वेळेनुसार ही कार्यालये सुरू असतात.
या कार्यालयाला आज भेट दिली असता, सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत येथील कार्यालय सुरू असते. तर शनिवारी आणि रविवारीसुद्धा आम्ही काम करत होतो, फक्त काल धुळवडीची सुट्टी होती, असे वि.दो. गांगुर्डे यांनी सांगितले.
आज आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने येथे स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशनसाठी नागरिकांची तशी गर्दी होती. कोरोनाच्या नियमांचे पालन केले जाते. नागरिकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध होते.