कोरोना काळात घरांची खरेदी-विक्री जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:06 AM2021-04-01T04:06:43+5:302021-04-01T04:06:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे गेले वर्षभर कोरोनामुळे उद्योगधंदे व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना, घरांची खरेदी-विक्री मात्र ...

Home sales are booming during the Corona period | कोरोना काळात घरांची खरेदी-विक्री जोरात

कोरोना काळात घरांची खरेदी-विक्री जोरात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एकीकडे गेले वर्षभर कोरोनामुळे उद्योगधंदे व आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना, घरांची खरेदी-विक्री मात्र जोरात झाली आहे. राज्याच्या नोंदणी व शुल्क विभागाने गेल्या सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क पूर्वीच्या ५ टक्क्यांवरून तो २ टक्के केल्याने मालमत्तांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिकांनी या सवलतीचा फायदा घेत आधी स्टॅम्प ड्युटी भरली, मग नोंदणी केली. तर बांधकाम व्यावसायिकांच्या शिल्लक असलेल्या घरांची या काळात चांगली विक्री झाली.

गेल्या सप्टेंबर २०२० ते ३० मार्च २०२१पर्यंत मालमत्तांच्या स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशनमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.

पश्चिम उपनगरातील बोरीवली तालुक्यातील गोरेगाव पश्चिम स्टेशनजवळ असलेल्या सहदुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ४ येथे सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२०पर्यंत १६३० मालमत्तांची नोंदणी झाली, तर स्टॅम्प ड्युटीची उलाढाल ३६ कोटी २० लाख ८८ हजार ७७२ रुपये, तर मालमत्तांच्या नोंदणीची उलाढाल ४ कोटी ६० लाख ८ हजार ३१० रुपये इतकी झाली. १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१पर्यंत मुद्रांक शुल्कचा दर ३ टक्के करण्यात आला.

याकाळात ६३१ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली. तर स्टॅम्प ड्युटीची उलाढाल २१ कोटी ८९ लाख २९ हजार ५५८ रुपये, तर मालमत्तांच्या नोंदणीची या तीन महिन्याची उलाढाल १ कोटी ८४ लाख ५३ हजार ९६० रुपये इतकी झाली. येथील सहदुय्यम निबंधक वि.दो. गांगुर्डे यांनी लोकमतला ही आकडेवारी दिली. भाड्यांवर देण्यात येणाऱ्या घरांच्या लिव्ह अँड लायसन्सच्या ऑनलाइन व्यवहारांना नागरिकांची जास्त पसंती असून रोज ३० ते ३५ सदर व्यवहार होतात, तर येथे प्रत्यक्ष १० ते १५ व्यवहार होतात. सर्व्हर डाउनची समस्या आली तरी ती तेवढ्यापुरती असते, मग काम सुरळीत सुरू होते असे त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या सोयीसाठी बोरीवली तालुक्यात सहदुय्यम निबंधकांची नऊ कार्यालये असून अंधेरी तालुक्यात सात कार्यालये आहेत. विशेष म्हणजे तीन पाळ्यांत सकाळी ७ ते दुपारी २, सकाळी १० ते सायंकाळी ६ आणि दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत विविध ठिकाणी त्यांच्या वेळेनुसार ही कार्यालये सुरू असतात.

या कार्यालयाला आज भेट दिली असता, सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत येथील कार्यालय सुरू असते. तर शनिवारी आणि रविवारीसुद्धा आम्ही काम करत होतो, फक्त काल धुळवडीची सुट्टी होती, असे वि.दो. गांगुर्डे यांनी सांगितले. आज आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने येथे स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशनसाठी नागरिकांची तशी गर्दी होती. कोरोनाच्या नियमांचे पालन केले जाते. नागरिकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध असून नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत आणि मास्क घालून येथे आम्हाला चांगले सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Home sales are booming during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.