Join us

मुंबईत गृहविक्रीला ‘घरघर’; सात महिन्यांत ७२ हजार ७०६ घरांची विक्री, गेल्या वर्षीपेक्षा ५ हजार ३९५ कमी विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 1:55 PM

गेल्या वर्षीच्या तुलनेत हा महसूल दोन कोटी रुपयांनी जास्त आहे.

मुंबई : नुकत्याच संपलेल्या जुलै महिन्यात मुंबईत एकूण १० हजार २०० मालमत्तांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात मुंबईत एकूण ११ हजार ३४० मालमत्तांची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा घट झाल्याचे दिसते. मात्र, असे असले तरी यंदा झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये मुंबईत मोठ्या घरांची विक्री जास्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच गेल्यावर्षी जुलै महिन्यात घरांच्या विक्रीमधून सरकारी तिजोरीत ८२९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असला तरी यंदा घरांची विक्री कमी होऊनही सरकारी खजिन्यात ८३१ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा महसूल दोन कोटी रुपयांनी जास्त आहे.

बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य अशा नाइट फ्रँक संस्थेने यासंदर्भात आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार, घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांनी मुंबई व महामुंबई परिसराला प्राधान्य देण्याचा ट्रेंड कायम असल्याचे दिसून आले. जुलै २०२३ मध्ये मुंबईत विक्री झालेल्या घरांपैकी ८२ टक्के मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या आहेत, तर उर्वरित १८ टक्के मालमत्ता या व्यावसायिक स्वरूपाच्या आहेत. घरांच्या विक्रीचा जो ट्रेंड समोर आला आहे त्यानुसार मुंबई शहर व उपनगरामध्ये १ कोटी रुपये आणि त्यापुढील किमतीच्या घरांची विक्री जास्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या घरांची विक्री सर्वाधिक आहे. परवडणाऱ्या दरांतील घरांच्या विक्रीला मात्र फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून आले. गेल्या मे महिनापासून आतापर्यंत गृहकर्जावरील व्याजदरामध्ये अडीच टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातच चलनवाढ अद्यापही नियंत्रणात नाही. परिणामी वाढती महागाई आणि चढे व्याजदर याचा प्रामुख्याने फटका हा परवडणाऱ्या दरातील घरांच्या विक्रीला बसल्याचे दिसून येते.  

२०२३ मधील पहिल्या सात महिन्यांत ६४५३ कोटी रुपये महसूल

२०२३ च्या पहिल्या सात महिन्यात मुंबईत एकूण ७२,७०६ घरांची विक्री झाली असून, यापोटी सरकारला ६४५३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये मुंबईत ७८,१०१ घरांची विक्री झाली होती. 

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग