लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई आणि दिल्लीसह देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत तब्बल ८१ टक्क्यांची घट झाली. मालमत्ता सल्लागार संस्था ‘ॲनाराॅक’च्या गेल्या आर्थिक वर्षाच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. गृहनिर्माण आणि विक्री क्षेत्राला काेराेनामुळे बसलेला फटका या आकडेवारीतून अधाेरेखीत हाेताे, असे या अहवालात म्हटले आहे.
‘ॲनाराॅक’च्या अहवालानुसार, गेल्यावर्षी काेराेना महामारीचे भारतात आगमन झाल्यानंतर दुसऱ्या तिमाहीत १२ हजार ७२० घरांची विक्री झाली हाेती. त्यातुलनेत २०१९-२० या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत ६८ हजार ६०० घरांची विक्री झाली हाेती. एप्रिल ते जून या कालावधीत दिल्ली एनसीआर, मुंबई महानगर परिक्षेत्र, बेंगळुरू आणि पुणे या शहरांमध्ये एकूण विक्रीच्या ८५ टक्के घरांची विक्री झाली. त्यातही मुंबई आणि बेंगळुरू या शहरांमध्येच ५१ टक्के घरविक्री झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबई, दिल्ली, काेलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या शहरांमधील गृहप्रकल्पांची माहिती गाेळा करून ‘ॲनाराॅक’ने अहवाल तयार केला आहे. काेराेना महामारीमुळे देशव्यापी लाॅकडाऊन लावण्यात आला हाेता.