घरांची विक्री निम्म्यावर; गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 01:50 AM2020-10-09T01:50:43+5:302020-10-09T01:50:55+5:30
नवे गृहनिर्माणही ५८ टक्क्यांनी घटले
मुंबई : २०१९ मध्ये प्रत्येक तिमाहीत मुंबईत १५,२३६ घरांची विक्री झाली होती. यंदा ती संख्या ७, ६३५ म्हणजेच निम्म्याने कमी झाली आहे. गेल्या वर्षी नव्याने सुरू झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांतील घरांची संख्या १९,९५३ इतकी होती.
यंदा त्यात तब्बल ५८ टक्के घट झाली असून ८,३८९ नव्या घरांची उभारणी सध्या सुरू आहे. सप्टेंबर महिन्यांत मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीला चालना मिळताना दिसत असली तरी येत्या शेवटच्या तिमाहीत ती झेप गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत तोकडीच पडणार असल्याचे ही आकडेवारी सांगते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार संस्था असलेल्या नाईट फ्रँक या संस्थेने केलेल्या इंडियन रिअल इस्टेट (जुलै ते सप्टेंबर, २०२०) अहवाल गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. त्यातून ही माहिती हाती आली आहे. देशात कोरोना दाखल झाल्यानंतरच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) मुंबईत अवघ्या २,६८७ घरांची विक्री झाली होती. ती सप्टेंबर अखेरीस संपलेल्या तिमाहीत ७,६३५ घरांची विक्री झाली आहे.
राज्य सरकारने दिलेली मुद्रांक शुल्कातील सवलत, कमी व्याजदर, घरांच्या कमी झालेल्या किमती आणि विकासकांनी दिलेल्या आकर्षक सवलतींमुळे गृहविक्रीला चालना मिळत असल्याचे नाईट फ्रँकच्या मुख्य आर्थिक सल्लागार रजनी सिन्हा यांनी सांगितले. जर, पित्रृपंधरवड्यात घर खरेदीचे प्रमाण वाढत असेल तर आगामी दसरा दिवाळी या उत्सवांच्या काळात या क्षेत्रात उत्तम वाढ नोंदविली जाईल, अशा आशा व्यवस्थापकीय संचालक शिरीष बैजल यांनी व्यक्त केली.
मुंबईपेक्षा पुण्याची वाढ जास्त
घरविक्री आणि नव्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्याचा टक्का मुंबईपेक्षा पुण्यात जास्त असल्याचा हा अहवाल सांगतो. पुण्यात गेल्या वर्षी तीन महिन्यांतील घरांची सरासरी विक्री ८,२२२ होती. ती यंदा ६० टक्के कमी (४९१८) इतकी कमी झाली आहे. तर, नव्या गृहप्रकल्पांतील घरांची संख्या ११,१६५ वरून ६७२१ (६० टक्के) इतकी कमी झाली आहे.