Join us

घरांच्या विक्रीत २६ तर नव्या प्रकल्पांमध्ये ५१ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 6:05 PM

बांधकाम व्यवसायाला आधीच घरघर लागली होती; दोन वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे तुलनात्मक आकडे

 

मुंबई  : कोरोनाच्या संकटामुळे बांधकाम व्यवसायाचे कंबरडे मोडले असले तरी हे संकट कोसळण्यापूर्वीच या व्यवसायाला घरघर लागली होती. जानेवारी ते मार्च २०१९ आणि २०२० या वर्षांची तुलना केल्यास घरांची विक्री २६ टक्क्यांनी कमी झाली होती. तर, नवीन प्रकल्प सुरू करण्याचे प्रमाण तर ५१ टक्क्यांनी खालावले आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत संस्थांत्मक वित्तीय पुरवठ्यातही ५८ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.   

प्राँप टायगर या संस्थेने प्रसिध्द केलेल्या सर्वेक्षण अहवालातून ही माहिती हाती आली आहे. मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि पुणे या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह अहमदाबाद, बंगळूरू, चेन्नई, गुरूग्राम, हैद्राबाद, कोलकत्ता आदी नऊ शहरांचा त्यात समावेश आहे. मुंबईतील घरांच्या विक्रीत १४ टक्के तर पुण्यात १५ टक्के घट झाली आहे. उर्वरित शहरांच्या तुलनेत ती घट कमी आहे. देशातील ९ महत्त्वाच्या शहरांमध्ये २०१९ साली जानेवारी ते मार्च या तिमाहीत ९३ हजार ९३६ घरांची विक्री झाली होती. या वर्षी ती संख्या ६९ हजार २३५ इतकी झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात तिमाहीतली सर्वाधिक विक्री होते. मात्र, यंदा शेवटचा आठवड्यात एकही घराची विक्री न झाल्यामुळे तीव्रता वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर, याचा कालावधीतील नव्या प्रकल्पांतील घरांची संख्या ७२ हजार ९३२ वरून ३५ हजार ६८८ इतकी कमी झाल्याचे प्राँप टायगरचे निरीक्षण आहे.  

 

वित्त पुरवठाही ५८ टक्क्यांनी घटला होता : देशांतील बांधकाम व्यावसायिकांना २०१९ आणि २०२० सालातील जानेवारी ते मार्च महिन्यात झालेल्या वित्त पुरवठ्याची तुलना केल्यास त्यात ५८ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा तो पुरवठा ५ हजार ४३१ कोटी रुपयांवर खालावला आहे. तर दोन संपूर्ण आर्थिक वर्षांची तुलना केल्यास ती घट १३ टक्के इतकी आहे. जेएलएल इंडिया यांच्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.      

टॅग्स :बांधकाम उद्योगकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस