Join us

घरविक्रीचा देशात ११ वर्षांतील उच्चांक; ६ महिन्यांत १ लाख ७३ हजार घरांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 10:34 AM

गेल्या सहा महिन्यांत देशातील आठ प्रमुख शहरांत एकूण १ लाख ८३ हजार ४०१ घरांच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे.

मुंबई - गेल्यावर्षीप्रमाणे चालू वर्षातही देशातील घरांच्या विक्रीचा जोर कायम असून सरत्या सहा महिन्यांत देशातील प्रमुख आठ शहरांत एकूण १ लाख ७३ हजार २४१ घरांची विक्री झाली आहे. सहा महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरांची विक्री होणे हा गेल्या ११ वर्षांतील उच्चांक आहे.

बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या नाइट फ्रँक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबई, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या शहरांमध्ये सर्वाधिक घरांची विक्री गेल्या सहा महिन्यांत झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या सहा महिन्यांत ४७ हजार २५९  घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या सहामहीच्या तुलनेत यंदाच्या सहामहीत १६ टक्के वाढ झाली आहे. घरांची वाढती विक्री लक्षात घेता विकासकांनीदेखील मोठ्या प्रमाणावर नव्या प्रकल्पांचे काम सुरू केला आहे.

गेल्या सहा महिन्यांत देशातील आठ प्रमुख शहरांत एकूण १ लाख ८३ हजार ४०१ घरांच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. सहा महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरांच्या निर्मितीचे काम सुरू होणे हा देखील १० वर्षांतील विक्रम ठरला आहे. नव्या घरांच्या निर्मितीमध्ये मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर असून गेल्या सहा महिन्यांत मुंबईत एकूण ४६ हजार ९,८५४ घरांची निर्मिती सुरू झाली आहे. त्यानंतर कोलकाता शहराचा क्रमांक असून पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ज्या घरांची किंमत १ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा घरांचे एकूण विक्रीतील प्रमाण ४१ टक्के आहे. ज्या घरांची किंमत ५० लाख रुपये ते एक कोटी रुपयांच्या दरम्यान आहे अशा घरांचे विक्रीतील प्रमाण २७ टक्के इतके आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण ३२ टक्के इतके होते. त्यामध्ये पाच टक्के घट झाली आहे. मात्र, महागड्या घरांच्या विक्रीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.