Join us

घरच्या घरी विज्ञानाचे धडे; कृतियुक्त शिक्षणाचे छोटे टास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 1:57 AM

८५ विद्यार्थी आले एकत्र : डिझाइन थिकिंग संकल्पनेची ओळख

मुंबई : अनलॉकदरम्यान अनेक गोष्टी सुरू होत असल्या तरीही शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अशा वेळी घरबसल्या विद्यार्थ्यांना काही ना काही शिकता यावे. घरातल्याच वस्तूंचा वापर करून नव्या गोष्टी बनविता याव्यात. विशेषत: शोधा, खेळा, शिकाद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञान शिकता यावे म्हणून अनेक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अगस्त्य फाउंडेशनमार्फत नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या आॅनलाइन उपक्रमात राज्यातल्या सातारा, कोल्हापूर, वाशिम, अमरावती, कल्याण, पनवेल, मुंबई अशा विविध भागांतील ८५ विद्यार्थी एकाच वेळी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून एकत्र आले; आणि अचानक सुरू झालेल्या हमको मन की शक्ती देना, या व्हिडीओ प्रार्थनेने विद्यार्थ्यांना शाळेत आल्याचाच अनुभव आला.

सावलीच्या माध्यमातून चित्रकला या कृतीतून डिझाइन थिंकिंग संकल्पनेची तोंडओळख करून देण्यात आली. पुढच्या सत्रात एका कृतियुक्त मॉडेलमधून हवेचा दाब, फुप्फुस आणि श्वासोच्छवास प्रक्रिया उलगडण्यात आली. दोन महिने अगस्त्य फाउंडेशनच्या माध्यमातून शोधा, खेळा, शिका हे आॅनलाइन कॅम्प व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून सुरू आहेत. यामध्ये राज्यातील पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी आहेत. त्यांना रोज कृतियुक्त विज्ञानाचे छोटे टास्क दिले जातात. घरातील उपलब्ध साहित्य वापरून विद्यार्थी ते करतात, त्याचे फोटो व्हिडीओ ग्रुपवर शेअर करतात. अगस्त्यमार्फत सुरू असलेल्या आॅनलाइन शिक्षक प्रशिक्षण वर्गामधूनही आतापर्यंत १३ बॅचमधून सुमारे ६०० शिक्षकांनी लाभ घेतला आहे. आता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबत लाइव्ह व्हिडीओ कॉलद्वारे शिक्षणाला मिळालेला प्रतिसाद पाहून पुढील काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा संस्थेचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती व्यवस्थापक अमोल नामजोशी यांनी दिली.पर्यावरणाचा अभ्यासजागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक प्रश्नमंजुषा घेऊन त्याच्या उत्तरांची त्यांना माहिती देण्यात आली. एक तासासाठी नियोजित हा कॉल सुमारे दोन तास चालला. विद्यार्थी उत्स्फूर्तपणे चर्चा करत होते, उत्तर देत होते, शंका विचारत होते. चॅट बॉक्सचा उत्तम वापर करत होते.

टॅग्स :मुंबई