मुंबई : झोपडपट्टी परिसरांसह इतर परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचा होत असलेला वापर आणि त्यामुळे कोविड संसर्गाची संभाव्यता लक्षात घेत सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण केले जात आहे. तसेच सार्वजनिक शौचालयांमध्ये साबण, सॅनिटायझर असण्याकडेही काळजीपूर्वक लक्ष पुरविण्यात येत असून, कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. याचा परिणाम म्हणून येथील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.
मुंबईत कोविडबाधित पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये आढळून आला. तेव्हापासून आजतागायत महानगरपालिका सातत्याने व अविरतपणे कोविड-१९ प्रतिबंधक व उपचारविषयक सर्वस्तरीय कार्यवाही करीत आहे. यासाठी महानगरपालिकेचे कामगार, कर्मचारी, अधिकारी अथकपणे कार्यरत आहेत. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. महापालिकेच्या सर्वच २४ प्रशासकीय विभागात सूक्ष्मस्तरीय नियोजन अव्याहतपणे करण्यात येत आहे. यामध्ये घर, सोसायटी, रस्ता, गल्ली अशा सर्वच बाबींचा विचार करून नियोजन करण्यात येत आहे.
सध्या दररोज हजारो व्यक्तींची कोविड चाचणी केली जाते. ज्या व्यक्तींचा चाचणी अहवाल कोविडबाधित असल्याचे आढळून आले आहे, अशा व्यक्तींच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होते. धारावीसह सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपायोजना अव्याहतपणे राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने चेस द वायरस आणि ट्रेसिंग-टेस्टिंग-ट्रॅकिंग-ट्रिटिंग या चतु:सूत्री आधारित उपाययोजनांचा समावेश आहे.
याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तींचे अलगीकरण (विलगीकरण) करणे, आवश्यकतेनुरूप संशयितांच्या व बाधितांच्या कोविडविषयक वैद्यकीय चाचण्या करणे आणि लक्षणे असलेल्या बाधितांवर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार अर्थात मेडिकल प्रोटोकॉलनुसार औषधोपचार करण्याचा समावेश आहे.
-----------------------
कोविड प्रमाण कमी
माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम सप्टेंबर-ऑक्टोबर २०२०मध्ये प्रभावीपणे राबविण्यात आली. याअंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची प्राणवायू पातळी मोजणे, तापमान मोजणे आदी बाबी करण्यात आल्या. घरातल्या व्यक्तींना सहव्याधी असल्यास किंवा लक्षणे असल्यास उपचार क्रमानुसार कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेचा प्रभाव दिसून आला. या मोहिमेनंतर कोविड बाधितांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आढळून आले होते.
-----------------------
असे झाले प्रयत्न
- कोविड बाधित रुग्णांना योग्य औषधोपचार
- रुग्णांना आवश्यक औषधे
- इंजेक्शन पुरेशा प्रमाणात
- औषधोपचारविषयक साठा
- कोविड रुग्णांना प्राणवायू
- रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड
- २४ विभागांसाठी समन्वय अधिकारी
- सूक्ष्मस्तरीय नियोजन, समन्वयन, व्यवस्थापन
- विभागस्तरीय वॉर रूम कार्यान्वित
- रुग्णवाहिका कार्यरत
- शीघ्रकृती कार्यक्रम अभियान
- फिरते दवाखाने
- सातत्याने जनजागृती
- घरोघरी भेटी
- नागरिकांना यथायोग्य माहिती
- विविध संवाद माध्यमांचा वापर