Join us

ब्रिटनमधून आलेल्या 1,583 जणांची घरी जाऊन तपासणी; २५ नोव्हेंबरनंतर आलेल्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 2:01 AM

CoronaVirus News : ब्रिटनमधून मुंबई विमानतळावर सोमवारपासून आतापर्यंत १,६८८ प्रवासी आले. यापैकी मुंबईतील हॉटेलमध्ये ७५४ प्रवासी क्वारंटाईन आहेत.

मुंबई : इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्यामुळे सोमवारपासून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. मात्र महिनाभराच्या कालावधीत मुंबईत आलेल्या अशा परदेशी प्रवाशांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे २५ नोव्हेंबरनंतर मुंबईत आलेल्या १,५८३ प्रवाशांच्या घरी जाऊन पालिकेचे वैद्यकीय पथक तपासणी करणार आहे.ब्रिटनमधून मुंबई विमानतळावर सोमवारपासून आतापर्यंत १,६८८ प्रवासी आले. यापैकी मुंबईतील हॉटेलमध्ये ७५४ प्रवासी क्वारंटाईन आहेत. तर २५ नोव्हेंबर २०२० पासून, म्हणजे एक महिन्याच्या कालावधीत मुंबईत आलेल्या लोकांनी त्यांच्यात कोरोनाविषयक लक्षणे आढळल्यास त्वरित वॉर्ड वॉर रूमशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले होते. मात्र आता कोणताही धोका न पत्करता अशा प्रवाशांच्या घरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.विमानतळ प्राधिकरणाकडून अशा १,५८३ प्रवाशांच्या नावांची यादी, त्यांच्या घरचा पत्ता व संपर्क क्रमांक पालिकेने मिळविले आहेत. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक त्या - त्या विभागातील प्रवाशांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करेल. या पथकामध्ये दहा अधिकारी - कर्मचारी असतील. प्रत्येक विभागाच्या साहाय्यक आयुक्तांची बैठक बोलावून नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

आवश्यकतेनुसार चाचणीसह उपचारपालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांतील वैद्यकीय पथके २५ नोव्हेंबर २०२० नंतर ब्रिटनमधून आलेल्या १,५८३ प्रवाशांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करणार आहेत. यापैकी एखाद्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांची चाचणी व आवश्यकतेनुसार त्यांना उपचार देण्यात येतील.- सुरेश काकाणी (अतिरिक्त पालिका आयुक्त)

ब्रिटनहून आलेल्या नागरिकांना पालिकेची सूचना- फॅमिली डॉक्टर, पालिका दवाखाना, आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.- कोविड चाचणी करून घ्यावी. मास्कचा वापर, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर राखावे.- ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे अथवा अन्य आजारांचे कोणतेही लक्षण असल्यास ‘वॉर्ड वॉर रूम’शी संपर्क साधावा.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका