बेघर मुले बालगृहापेक्षा मुख्य प्रवाहात हवीत, समुपदेशनावर दिला जात आहे भर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 09:20 AM2023-05-08T09:20:07+5:302023-05-08T09:23:06+5:30
मोहिमेत सापडलेल्या बालकामगार बालकांना त्यांच्या गावाला पाठविले जात आहे.
श्रीकांत जाधव
मुंबई : भर रस्त्यात बालपणाचे दिवस काढणाऱ्या बेघर आणि बालकामगार मुला-मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या काही विभागांनी एकत्रित ‘रेस्क्यू ऑपरेशन’ २ मे पासून हाती घेतले आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत मुलांना जबरदस्तीने बंदिस्त बालगृहात प्रवेश देण्यापेक्षा त्यांना स्वतःहून आणि पालकांच्या मान्यतेने इतरांसारखे मुख्य प्रवाहात आणायचे प्रयत्न विविध माध्यमातून करण्यात येत आहेत. मोहिमेत सापडलेल्या बालकामगार बालकांना त्यांच्या गावाला पाठविले जात आहे.
‘रेस्क्यू ऑपरेशन’ कोणाचा सहभाग ?
सरकारकडून एकत्रित हाती घेतलेल्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये प्रामुख्याने महिला बाल विकास विभाग, कामगार, पोलिस, बालकल्याण समिती, आयसीडीएस, शिक्षण आणि युनिसेफचे अधिकारी, कर्मचारी काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांचा एकत्र सहभाग आहे. गेल्या वर्षी ८३६ बालकांचा शोध घेतला गेला होता. त्यातील १४ मुली आणि ९ मुले मुख्य प्रवाहात येत आहेत. इतर मुलांसाठी ८ खुले निवारागृह आहेत.
समुपदेशनातून मत परिवर्तन
मोहिमेत शेकडो मुले सापडतात. काही मुले रस्त्यावर, सिग्नलवर, बागेत, बाजारात, समुद्र किनाऱ्यावर कुटुंबासमवेत आढळतात.
तेव्हा त्यांच्या कुटुंबाशी मोकळा संवाद साधला जातो. त्यांना जबरदस्ती न करता समुपदेशन आणि यंत्रणांची माहिती देण्यात येते.
गरज भासल्यास मुलांना बालगृहात किंवा डे केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. कुटुंबांसोबत बोलून बालकाची माहिती घेतली जाते. आवश्यकता असल्यास कुटुंबाला माहिती देऊन बालकल्याण समितीला भेटण्यास सांगितले जाते.
मोहिमेत बालकामगार आढळून येतात. तेव्हा अल्पवयीन कामगाराच्या मालकाकडून लेखी हमीपत्र घेण्यात येते. तसेच बालकाला त्याच्या घरी तातडीने पोहोचविण्याबाबत प्रयत्न केले जातात.
पालकांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बालगृह किंवा खुले निवारागृहामधील राहणीमान दाखवले जाते आणि स्वयंप्रेरणेने त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी सांगितले.