मनोर : पालघर तालुक्यातील उंबरपाडा सफाळे येथील वृद्ध आदिवासी महिलेचे घर आणि जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून बळकावल्याप्रकरणी या वृद्धेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी पोलीस, डॉक्टर अद्याप फिरकलेलेच नाहीत. त्यामुळे महिलेची प्रकृती गंभीर झाली आहे.बेबी रुपजी बुजड यांचे सफाळे उंबरपाडा येथील सर्वे नं. ३६ अ/७ ब क्षेत्र ३ गुंठे तसेच उंबरपाडा येथील राहते घर ग्रामपंचायत व तलाठी महसूल विभागाने खोटी कागदपत्र तयार करून बळकावल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सरकार दरबारी वेळोवेळी तक्रारही करून न्याय मिळत नसल्याने अखेर दोन दिवसापासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या महिलेने बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे. मात्र, या उपोषणाच्या ठिकाणी एकही डॉक्टर न आल्याने बेबी यांची प्रकृती गंभीर झाली. चक्कर येत असूनही एकाही पोलिसाने त्या वयोवृद्ध महिलेची खबर घेतली नाही. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी १.३० च्या सुमारास पालघर तहसीलदार चंद्रसेन पवार हे उपोषणाच्या ठिकाणी येऊन विचारपूस करून कागदपत्राची तपासणी करीत होते. याची शहानिशा करून न्याय मिळवून देऊ तुम्ही उपोषण सोडा अशी विनंती केली. परंतु वृद्धेने त्यास नकार दिला. तहसिलदार पवार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना फोन करून बोलावले तसेच डॉक्टरलाही बोलावले. मात्र, या दोघांनीही उपोषणाच्या ठिकाणी येण्यास विलंब केला.आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष दत्ता करबड यांनी सांगितले की आदिवासींच्या नावावर प्रत्येकजण आपला फायदा करून घेतात. मात्र आजही आमचा आदिवासी उपेक्षितच आहे. आजही आम्हाला न्यायासाठी उपोषण करण्याची वेळ येते. (वार्ताहर)
आदिवासी महिलेला केले बेघर
By admin | Published: February 10, 2015 10:39 PM