शाळा, कॉलेज कॅन्टीनमध्ये मिळणार घरगुती अन्न; एफडीएचा ‘स्कूल अँड कॉलेज फूड प्रोजेक्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 01:50 AM2019-06-01T01:50:37+5:302019-06-01T06:17:12+5:30

कच्चामाल, पाणी, तयार जेवण कसे हाताळावे इत्यादींची चेकलिस्टही एफडीएने तयार केली आहे. मुंबईतील एक हजार शाळांना हे पत्र पाठविले आहे़

Homemade food will be provided at the school, college canteen; FDA's 'School and College Food Project' | शाळा, कॉलेज कॅन्टीनमध्ये मिळणार घरगुती अन्न; एफडीएचा ‘स्कूल अँड कॉलेज फूड प्रोजेक्ट’

शाळा, कॉलेज कॅन्टीनमध्ये मिळणार घरगुती अन्न; एफडीएचा ‘स्कूल अँड कॉलेज फूड प्रोजेक्ट’

googlenewsNext

मुंबई : शाळा व महाविद्यालयांतील उपहारगृहांमध्ये आता घरगुती पदार्थ मिळणार आहेत़ तसा फतवाच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जारी केला आहे़ यासाठी एफडीएने सर्व शाळा व महाविद्यालयांना ईमेलद्वारे एक पत्र जारी केले आहे़ उपहारगृहांमध्ये कोणते अन्न असावे, याची मार्गदर्शक तत्त्वे या पत्रात आहेत़ त्याची अंमलबजावणी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये होईल़ त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना उपहारगृहांमध्ये घरगुती अन्न मिळेल़
‘स्कूल अँड कॉलेज फूड प्रोजेक्ट’अंतर्गत एफडीए हा उपक्रम राबवित आहे़ त्यानुसार, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पत्र पाठविले जाईल. या पत्राचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे़ पहिल्या भागात असे सांगण्यात आले की, एक आहार समिती स्थापन करा. या समितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि आहारतज्ज्ञांचा समावेश करावा. त्यानंतर, समितीने एफडीएच्या गाइडलाइन्सप्रमाणे उपहारगृहामध्ये कोणते पदार्थ ठेवावेत, याचा विचार करावा. उपहारगृहाचे धोरण ठरवावे.

पारंपरिक व घरगुती पदार्थांचा जास्त वापर करावा. अधिक मेद, मीठ आणि साखर असलेल्या अन्नपदार्थांवर बंदी घालावी. हिरव्या भाज्या या ८० टक्के आहारामध्ये असाव्यात. भाग दोनमध्ये उपहारगृह स्वच्छ आणि निरोगी कसे असले पाहिजे, याबद्दल माहिती देण्यात आली आहे. कच्चामाल, पाणी, तयार जेवण कसे हाताळावे इत्यादींची चेकलिस्टही एफडीएने तयार केली आहे. मुंबईतील एक हजार शाळांना हे पत्र पाठविले आहे़

२५ ते ३० पानांची मार्गदर्शक तत्त्वे एफडीएने तयार केली आहेत़ वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करून, ‘स्कूल अँड कॉलेज फूड प्रोजेक्ट’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली. ज्या शाळांमध्ये उपहारगृह आणि कॅटरिंग फूड दिले जाते, अशाच शाळांवर जास्त लक्ष ठेवले जाईल.

असे असेल वेळापत्रक : मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये पत्र पाठविले जाईल, तसेच एफडीएच्या अधिकृत वेबसाइटवर पत्र व गाइड लाइन्स अपलोड करण्यात आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन हजार दोनशे शाळांमध्ये पत्र पाठविले गेले आहे. जून व जुलैमध्ये महाविद्यालयात फूड टीम ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करून घेतील. आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये गाइड लाइन्सनुसार पदार्थ विद्यार्थ्यांना दिले जातील. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये मुख्याध्यापक, प्राचार्य आणि फूड टीम यांच्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन केले जाईल. डिसेंबर महिन्यात शाळा व महाविद्यालयात फूड प्रोजेक्ट कसा सुरू आहे, याची तपासणी केली जाईल.

आहार हा घटक महत्त्वाचा आहे. पोषक आहाराच्या बाबतीत आपल्याकडे दुर्लक्ष होते. चुकीचे खाद्य मिळत असल्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा दिसून येतो. हायपर टेन्शन आणि मधुमेह यांसारखे आजार मुलांमध्ये वाढत आहेत. ज्या अन्नपदार्थांमध्ये मेद, मीठ व साखर जास्त प्रमाणात असते, अशा अन्नपदार्थांना ‘एचएफएसएस’ (अधिक मेद, मीठ आणि साखर असलेले अन्नपदार्थ) अन्नपदार्थ म्हणतात. जास्त साखर खाल्ल्याने स्थूलपणा, मधुमेह इत्यादी आजार बळावतात. एचएफएसएसमध्ये चिप्स, बर्गर, फ्राइड फूड, कोला ड्रीग्स, इन्स्टंट नूडल्स इत्यादी पदार्थ मोडतात. मूल या आहाराकडे सहजरीत्या आकर्षित होतात, परंतु हे पदार्थ मुलांच्या आरोग्यास हानिकारक आहेत. 

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ.पल्लवी दराडे यांनी या संदर्भात सांगितले की, जागतिक अन्नसुरक्षा दिनानिमित्त ‘स्कूल अँड कॉलेज फूड प्रोजेक्ट’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. एक गाइड लाइन्स बनवून संपूर्ण शाळा व महाविद्यालयांना पाठवून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले जाणार आहे. देशामध्ये हा पहिला उपक्रम आहे. गाइड लाइन्स प्रमाणे शाळा व महाविद्यालयातील उपहारगृहांनी लक्ष देऊन त्याप्रमाणे पोषक आहार विद्यार्थ्यांना द्यावेत. तरुणपिढीच्या सर्वेक्षणातून असे सिद्ध झाले की, मुलांमध्ये लठ्ठपणा, हायपर टेन्शन व मधुमेह हे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एचएफएसएस पदार्थ मुलांना देणे शक्यतो टाळले पाहिजे.

२०१२-१३ सालच्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार, १४ लाख मुलांचा सर्व्हे करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना चांगले पोषक आहार मिळत नाही, असे इकॉनॉमिक सर्व्हेमधून सिद्ध झाले. नॅशनल इन्स्टिट्यूट न्युट्रीशियन यांनी २०११ साली दिलेल्या गाइड लाइन्सनुसार, आहारामध्ये कार्बोदके किती असले पाहिजे. प्रथिने व चरबीयुक्त पदार्थ किती याचे प्रमाण दिले होते, तसेच एफएसएसएआयच्या गाइड लाइन्सचाही विचार एफडीए प्रशासनाने केला आहे.

Web Title: Homemade food will be provided at the school, college canteen; FDA's 'School and College Food Project'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.