होमिओपॅथी डॉक्टर करणार ॲलोपॅथीची प्रॅक्टिस; इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 06:57 IST2024-12-28T06:57:14+5:302024-12-28T06:57:25+5:30

होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देणारे पत्रक अन्न आणि औषध प्रशासनाने काढले

Homeopathic doctor will practice allopathy Opposition from the Indian Medical Association | होमिओपॅथी डॉक्टर करणार ॲलोपॅथीची प्रॅक्टिस; इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध

होमिओपॅथी डॉक्टर करणार ॲलोपॅथीची प्रॅक्टिस; इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध

मुंबई : होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत असलेले डॉक्टर आता रुग्णांना ॲलोपॅथिक औषधे लिहून देऊ शकणार आहेत. होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देणारे पत्रक अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) काढले आहे. एफडीएच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मात्र विरोध दर्शविला आहे. 

होमिओपॅथीच्या ज्या डॉक्टरांनी शासनमान्य वैद्यकीय महाविद्यालयातून ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांनाच ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या पत्रकात नमूद आहे. होमिओपॅथीच्या डॉक्टरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी त्यामुळे पूर्ण झाली आहे. आयएमए या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार आहे. राज्यभरात ८० हजार होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यातील दहा हजार जणांनी वरील अभ्यासक्रम पूर्ण केला असून, त्यांनाच ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येईल, असे आयुष संचालनालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. होमिओपॅथी हा विषय आयुष संचालनालयाच्या अखत्यारित येतो. ॲलोपॅथीची २० ते २२ औषधे होमिओपॅथीच्या डॉक्टरांना लिहून देता येणार आहेत.

दरम्यान, अनेक गावांमध्ये होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांना ॲलोपॅथीची औषधे लिहून देण्याची परवानगी देण्यात आल्याचे आयुष विभागाचे संचालक वैद्य रमन घुंगराळेकर यांनी सांगितले.

होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस सुरू करू देण्याच्या निर्णयाविरोधात आम्ही यापूर्वीच कोर्टात गेलो होतो. अन्न व औषध प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधातही आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी द्यायची, हे योग्य नाही. 
    - डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, आयएमए (महाराष्ट्र)

Web Title: Homeopathic doctor will practice allopathy Opposition from the Indian Medical Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर