गिरगावातील होमिओपॅथी तज्ज्ञाचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:20 AM2020-06-02T06:20:10+5:302020-06-02T06:20:20+5:30
मृत्यू झालेले ५६ वर्षीय डॉक्टर गावदेवी येथील दळवी रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गावदेवी येथील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या डॉक्टरांची संख्या सहावर पोहोचली.
मृत्यू झालेले ५६ वर्षीय डॉक्टर गावदेवी येथील दळवी रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य होते. त्यांना १८ मे रोजी बॉम्बे रुग्णालयात दाखल केले होते. कोरोना झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. ताप आणि श्वासोच्छ्वास घेण्यास जास्त त्रास होऊ लगल्याने त्यांना २४ मे रोजी व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यानंतर दोनदा त्यांच्या तब्येतील सुधारणाही झाली. त्यामुळे कुटुंबीय ३ जून रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करीत होते. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला, अशी भावना मुलगा डॉ. पार्थ याने व्यक्त केली. पार्थ हे नायर रुग्णालयामध्ये सर्जनसाठी प्रशिक्षण घेत आहेत.
मृत डॉक्टर हे वयाच्या २८ व्या वर्षापासून या भागात सराव करीत होते. भारतीय सिनेसृष्टीतील कपूर यांचेही ते फॅमिली डॉक्टर होते. त्यांच्या मृत्यूमुळे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना भुलेश्वरमधील क्लिनिक चालविणारे ज्येष्ठ चिकित्सक डॉ. के. ढेबरी यांनी
व्यक्त केली.