मुंबई : कामगार म्हणून मान्यता देण्याची मागणी करत शेकडो घर कामगार व कचरावेचक महिलांनी मुलुंड येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली. कामगार म्हणून मान्यता नसल्याने सर्व सोयी-सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत कन्फेडरेशन फ्री ट्रेड युनियन आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखाली धडकलेल्या आंदोलनकर्त्या महिलांनी या वेळी व्यक्त केली.कित्येक वर्षे घरकामगार व कचरा वेचण्याचे काम करत असून सरकार मागण्यांची दखल घेत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. कामगार म्हणून मान्यता नसल्याने भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय सुविधा, सामाजिक सुरक्षा नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. या मोर्चात प्रामुख्याने मानवी हक्क अभियान, महाराष्ट्र असंघटित युनियन, मैत्रीण संस्था, संवेदना फाउंडेशन अशा अनेक संस्थांनी सहभाग नोंदवला.सीएफटीयूआयचे महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सद्य:स्थितीत सरकारचे वंचित वर्गाकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगून कामगारांनी न्याय हक्कासाठी संघटित राहून मोठा लढा उभारण्याची गरज व्यक्त केली. महिलांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली. संबंधित मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले.
घरकामगार व कचरावेचक महिलांचा हक्कासाठी एल्गार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 4:17 AM