Join us  

मुंबईतील घरे ५० टक्के महागली; ५ वर्षांत वाढल्या किमती, रिकाम्या घरांची संख्याही घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 10:52 AM

२०१९च्या पहिल्या सहामाहीपासून २०२४ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत महामुंबई परिसरातील घरांच्या किमती ४९ टक्क्यांनी वाढल्या.

मुंबई :मुंबईसह महामुंबई आणि दिल्ली-एनसीआर या महत्त्वाच्या ठिकाणी गेल्या पाच वर्षांत घरांच्या किमतींमध्ये सरासरी ५० टक्के वाढ झाल्याची माहिती बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या अॅनारोंक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. कोविड काळात देशातील अर्थचक्र थंडावले असताना मुंबईसह महामुंबई परिसरातील बांधकाम क्षेत्रात मात्र कोविड काळापासूनच तेजी निर्माण झाल्याचे निरीक्षण नमूद करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणानुसार, २०१९च्या पहिल्या सहामाहीपासून २०२४ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत महामुंबई परिसरातील घरांच्या किमती ४९ टक्क्यांनी वाढल्या. पाच वर्षांपूर्वी महामुंबई परिसरातील घरांचा प्रतिचौरस फूट सरासरी दर १०,६१० रुपये होता. तोच दर आता १५ हजार ६५० इतका झाला आहे.

आलिशान घरांच्या विक्रीत ११.५ टक्के वाढ-

गेल्या दीड वर्षात मुंबई शहर आणि उपनगरात दीड लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. या विक्रीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या घरांची किंमत एक कोटी ते पाच कोटीदरम्यान आहे, अशा घरांचे एकूण विक्रीतील प्रमाण ४१ टक्के आहे. त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत या घरांच्या विक्रीत ११.५ टक्क्यांची नोंद झाली आहे.

बांधकाम साहित्याचे वाढले दर-

१) तर, दिल्लीमध्ये प्रतिचौरस फूट सरासरी दर हा ४५६४ रुपये होता. तो आता ६८०० रुपये इतका झाला आहे. बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती आणि घरांच्या विक्रीची वाढती संख्या यामुळे प्रामुख्याने ही दरवाढ झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

२) कोविड काळामध्ये बहुतांश लोक घरातून काम करत होते. त्यामुळे घरातील मर्यादित जागेचा विस्तार करण्यासाठी बहुतांश लोकांनी मोठ्या घरांची खरेदी करण्यास प्राधान्य दिले. दरम्यान, या दोन शहरांत मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी घरखरेदीस पसंती दिल्यामुळे या दोन्ही शहरांतील रिकाम्या घरांची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी, रिकाम्या घरांची संख्या घटली आहे.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग