महापालिकेच्या भूखंडावर गिरणी कामगारांसाठी घरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 01:23 AM2019-01-29T01:23:38+5:302019-01-29T06:42:45+5:30
बंद पडलेल्या गिरण्यांचा पुनर्विकास करताना प्रत्येकी एक तृतीयांश जागा मालक, महापालिका आणि म्हाडा यांच्यात विभागणी करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.
मुंबई : बंद पडलेल्या गिरण्यांचा पुनर्विकास करताना प्रत्येकी एक तृतीयांश जागा मालक, महापालिका आणि म्हाडा यांच्यात विभागणी करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. मात्र म्हाडाच्या ताब्यातील छोट्या भूखंडांवर गिरणी कामगारांसाठी घरे उभारणे शक्य होणार नाही. त्यामुळे म्हाडाकडून मिळणाऱ्या सहा लहान भूखंडांच्या मोबदल्यात महापालिका एक मोठा भूखंड गिरणी कामगारांच्या घरांसाठी देणार आहे.
म्हाडाचे भूखंड आकाराने लहान असल्याने त्यावर मैदान किंवा घरे बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे सुधारित विकास नियंत्रण नियमावलीतील कलाम ५८(१) (ब) नुसार गिरण्यांच्या पुनर्विकासांतर्गत म्हाडा प्राधिकरणाला मिळालेल्या सहा लहान आकाराच्या भूखंडांची अदलाबदल करण्यात येणार आहे. त्याबदल्यात महापालिकेच्या ताब्यातील एका भूखंडावर गिरणी कामगारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाला भूखंड देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
म्हाडाच्या ताब्यातील सहा लहान भूखंड पालिकेला उद्यानासाठी देण्यात येणार आहेत. भूखंड हस्तांतरणाची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचबरोबर महापालिकेला म्हाडाकडून प्राप्त होणाºया सहा भूखंडांवर नवीन उद्याने उभारली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.
हे आहेत भूखंड
मफतलाल- ४८१.४३ चौ. मीटर
मातुल्य मिल- ३८८.३० चौ. मीटर
हिंदुस्थान मिल युनिट अ आणि ब - ५४२.१० चौ. मीटर
व्हिक्टोरिया मिल- ८५० चौ. मीटर
हिंदुस्थान मिल (क्राउन मिल) - ६०२.१५ चौ. मीटर
एम.एस.टी.सी. - १००९.८३ चौ. मीटर